भायखळय़ातील नागरिकांवर नायजेरियन ड्रग्ज तस्करांचा हल्ला

सामना प्रतिनिधी । मुंबई

भायखळय़ाच्या एकतानगरमधील रहिवाशांवर नायजेरियन ड्रग्ज तस्करांनी शुक्रवारी हल्ला केला. भायखळा आणि सॅण्डहर्स्ट रोड स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांवर येण्याचा मार्ग बंद केल्यामुळे नायजेरियन ड्रग्ज तस्करांनी तुफान दगडफेक केली. यात १० ते १२ स्थानिक नागरिक जखमी झाले. याप्रकरणी १० नायजेरियन तस्करांवर भायखळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

भायखळा आणि सॅण्डहर्स्ट रोड स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांवर नायजेरियन ड्रग्ज तस्करांचा प्रचंड वावर असतो. या परिसरात अमली पदार्थांची मोठय़ा प्रमाणात खरेदी-विक्री होते. अमली पदार्थ खरेदी करण्यासाठी येणारे एकतानगरमधील मार्गाने ये-जा करतात. त्यांचा प्रचंड मनस्ताप भायखळय़ातील रहिवाशांना विशेषकरून महिलांना व्हायचा. यामुळे संतापलेल्या नागरिकांनी फूट ओव्हर ब्रिजवरून रेल्वे रुळांवर उतरण्याचा मार्गच बंद केला. अमली पदार्थ खरेदी करण्यासाठी कोण येत नाही हे लक्षात येताच शुक्रवारी १० ते १२ नायजेरियन तस्करांनी हा मार्ग पुन्हा खुला करण्याचा प्रयत्न केला. याची कुणकुण लागताच भायखळा परिसरातील सुमारे ५० ते ६० स्थानिक नागरिक या ठिकाणी जमा झाले. हे पाहून नायजेरियन तस्करांनी त्यांच्यावर दगडफेक केली. नायजेरियन तस्करांनी एका नागरिकाला ताब्यातही घेतले.

या घटनेची माहिती मिळताच भायखळा पोलीस घटनास्थळी पोहचले. नागरिकांसह पोलिसांनीही नायजेरियन तस्करांचा रेल्वे रुळांतून पाठलाग सुरू केला, पण १० ते १२ नायजेरियन तस्कर पळून जाण्यात यशस्वी झाले. या हल्ल्यात १० नागरिक जखमी झाले. याप्रकरणी नायजेरियन तस्करांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिंगटे यांनी दिली.

पोलिसांवरही झाला होता हल्ला
भायखळा आणि सॅण्डहर्स्ट रोड स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांवर होणारी ड्रग्जची खरेदी-विक्री रोखण्यासाठी मुंबई क्राइम ब्रँचने कंबर कसली होती. २०१६ सालात या परिसरात कोम्बिंग ऑपरेशन हाती घेण्यात आले, पण यावेळी क्राइम ब्रँचच्या पथकावरही नायजेरियन तस्करांनी हल्ला चढविला. यात आठ पोलीस जखमी झाले. नायजेरियन तस्करांना रोखण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला.

आपली प्रतिक्रिया द्या