रातराणीच्या फुलांचा गंध करी आसमंत बेधुंद !

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जे. डी. पराडकर । संगमेश्वर

निसर्गाकडून मानवाला अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. त्यामध्ये स्वतः फुलून त्याचा गंध मात्र आसमंतात सर्वदूर पोहचविणाऱ्या फुलांकडून त्याग करण्याची वृत्ती अनुभवता येते. फुलांनी फुलायचे, आपल्या सौंदर्याने आणि धुंद करणाऱ्या गंधाने देवादिकांसह स्त्रीयांना मोहित करायचे व कालांतराने निर्माल्य बनून स्वतःचे अस्तित्व विसरून जायचे. फुलांच्या या त्यागी वृत्तीमुळेच सृष्टीतील सर्व सजीवांना त्यांचे कमालीचे आकर्षण असते. निसर्गदेवतेने निर्माण केलेल्या अनेक फुलांपैकी रातराणीची फुले म्हणजे, जणू या देवतेने आनंदाच्या भरात निर्माण केलेला नशीला गंधच ! वास्तव जीवनात गुरुंच्या जीवना प्रमाणेच फुलांचे कर्तव्य दिसून येते. स्वतः फुलून गंध मात्र दुसऱ्याला देत राहायचे. काळोख्या रात्री गंधाने आसमंत दरवळवणारी रातराणीची फुले तन मन मोहित करतात.

अत्यंत नाजूक असणाऱ्या या फुलांचे नामकरण रातराणी असं का झालं असावं , असा प्रश्न पडणं साहजिकच आहे. मात्र काळोखावर मोहित करणाऱ्या आपल्या गंधाने अधिराज्य गाजविणाऱ्या इवल्याश्या, नाजूक फुलांना राणीची उपमा देणे म्हणजे, निसर्ग राजाचा मोठा सन्मानच आहे. राणी ही श्रेष्ठच असते आणि बऱ्याचदा नाजूकपणासह सौंदर्याने ओतप्रोत भरलेली तसेच नाजूक कांतीने सर्वांचेच लक्ष वेधणारी राणी आपल्या गुणांनी स्वतःचे श्रेष्ठत्व सिध्द करते. रातराणीची फुले आपल्या गंधाने स्वतःचे श्रेष्ठत्व सिध्द करत असल्याने यांना रात्रीची राणी म्हणजे ‘रातराणी’ हे उचित नांव दिले गेले असावे. या फुलांच्या गंधाचे वर्णन करायला शब्दच अपुरे पडतील, यासाठी निसर्ग देवतेला झालेला आनंद म्हणजे रातराणीचा गंध असे म्हणणेच उचित ठरेल.

सुगंध देणाऱ्या अनेक वनस्पती आहेत. या सुगंधी फुलांमुळे मन आनंदित तर होतेच, शिवाय आरोग्यही चांगले राखले जाते. सर्वसाधारणपणे सर्व वासाची फुले रात्री उमलतात व दिवसा ती फुले फुललेली असतात. फुले उमलत असताना त्याचा सुगंध वातावरणात पसरत असतो. वनस्पतींच्या प्रकारानुसार त्या फुलांचा दरवळ कमी-अधिक अंतरापर्यंत पसरत असतो. रात्री फुलणारी बहुतेक सुगंधी फुले पांढरी असतात. ज्या ठिकाणी वातावरणात आद्रता आणि उष्णता असते, तिथे फुलांचा सुगंध थोडा कमी असतो. मात्र कोरडय़ा, रूक्ष व थंड वातावरणात त्याच वनस्पतीच्या फुलांना अधिक सुगंध असतो. रात्री सुगंध देणाऱ्या वनस्पतींमध्ये रजनीगंधा (निशीगंध), जाई, जुई, सायली, चमेली, मोगरा, कवठी चाफा, सोनचाफा, पारिजातक, कुंती, मधुमालती, आणि सर्वात तीव्र सुगंध वातावरणात पसरविणारी रातराणी. नावातूनच तिचे महत्त्व पटते. रात्री फुलणाऱ्या वनस्पतींची राणी. रातराणीविषयी बरेच गैरसमज आहेत. तिच्या सुगंधाने साप येतात. त्यामुळे रातराणी घराजवळ लावू नये. प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळी आहे. रातराणी हे झुडूप आहे. त्याच्या फांद्या अगदी जमिनीलगत वाढतात. उंदीर त्या आडोशाचा वापर करतात. त्यांच्या मागे साप येतात. मात्र आता शहरात साप जवळपास नाहीतच. शिवाय सापाला कोणत्याही प्रकारचा वास येत नाही. रातराणीची फुले नाजूक असल्यामुळे ती डोक्यात माळली जात नाहीत, तसेच देवालाही वाहिली जात नाहीत. अर्थातच त्यामुळे ती तोडण्याचा कुणीही प्रयत्न करीत नाही. त्यामुळेच रातराणीची फुले झाडाच्या अंगाखांद्यावर खेळत सुगंधाची लयलुट करतात आणि मानवी मन उल्हासित करून टाकतात.

शहर असो वा ग्रामीण भाग रातराणी कुंडीत अथवा घरपरड्यात हवीच. रात्रीच्या वेळी याच्या फुलांनी नेत्र आपोआप उघडले जावून अंतर्मनात हा गंध साठवून घेतील. रातराणीच्या गंधाने आळस झटकला जावून मन उत्साही तसेच प्रफुल्लीत होइल यात शंका नाही. रात्री गंध सोडण्याच्या या फुलांच्या सवयीमुळे तसेच यांच्या नाजूकपणामुळे ही फुले बाजारात उपलब्ध होत नाहीत. मुल जसं मातेच्या कुशीत सर्वाधिक सुरक्षित असते तद्वत रातराणीची फुले झाडावरच शोभून दिसतात. त्यामुळे फुले न तोडता त्यांचा गंध घेणे अधिक आनंददायी आहे. सध्या ठिकठिकाणी रातराणीच्या फुलांच्या गंधाने आसमंत धुंद होत आहे.