
>> नीलय वैद्य
रोजच्या जगण्याचा सूर बेताल होऊ लागला की समजून जावे आपले मन आणि मेंदू यांची योग्य सांगड घातली जात नाहीये. मन आणि मेंदूचे कार्य सुरळीत राहावे यासाठी त्यांनाही ‘टॉनिक’ची आवश्यक्ता असते, नाही का? हे नीट राखणे म्हणजे माइंडफुलनेस, जे आजच्या काळात अत्यंत आवश्यक आहे.
माइंडफुलनेस म्हणजे काय हे थोडक्यात सांगायचं झालं तर ‘माणसाला असलेलं वास्तववादी वर्तमानाचं भान’. 12 सप्टेंबर हा दिवस जगभरात ‘माइंडफुलनेस डे’ म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने आज प्रोएक्ट माइंड्स या संस्थेचे जाधव बंधू यांनी एका शिवाजी पार्क येथील वनिता समाज हॉल येथे कार्यक्रमाचं आयोजन केले आहे. ज्याचे नेतृत्व ज्येष्ठ मनोविकार तज्ञ आणि माइंडफुलनेस कोच डॉ. राजेंद्र बर्वे करत आहेत. आजच्या तरुण पिढीचे प्रतिनिधित्व करणारे डॉ. अनुपम बोराडे यांचाही या कार्यात सहभाग आहे.
माइंडफुलनेस डेच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमाविषयी बोलताना डॉ. राजेंद्र बर्वे म्हणाले, ‘माइंडफुलनेस हा आजच्या घडीचा परवलीचा शब्द आहे. माइंडफुलनेसविषयी सर्वांच्या मनात कुतूहल आहे. तरुण पिढीलाही याविषयी जाणून घ्यायचं आहे. ही संकल्पना नेमकी काय आहे, याचं व्यवस्थित प्रशिक्षण घेऊन सराव केला तर याचे काय फायदे होतात, हे समजणे आवश्यक आहे. यामुळे व्यक्तीचं, कुटुंबाचं, समाजाचं आणि एकूणच मानव जातीचं भलं होऊ शकतं, असा विश्वास आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मानसशास्त्रज्ञ यांच्या मनात निर्माण झाला आहे.’
एकदा एका विख्यात विद्यापीठात एक प्रसंग घडला. तिथे पदवीदान समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. यात विद्यार्थी, पालक, शिक्षक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. वातावरण उत्साह, तारुण्य, आनंद, उत्सुकता यांनी भारवलेलं होतं. कारण मुलं आज पदवीधर होणार होती. ती पदवी घेऊन सारे व्यावसायिक जगात प्रवेश करणार होते. प्रत्येकाकडे मोठमोठय़ा स्वप्नांचा खजिना होता. थोडय़ा वेळाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. कुलगुरूंनी सर्वांचं स्वागत केलं आणि भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले, आज तुमच्या स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. कारण तुम्ही तुमचं शिक्षण पूर्ण केलं आहे. मलाही याचा खूप आनंद होत आहे, पण आज मी एक गंभीर विषय तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. विषय थोडा वेगळा आहे, पण महत्त्वपूर्ण आहे. गेल्या काही वर्षांत आपल्या विद्यापीठातल्या तब्बल 18 मुलांनी आत्महत्या केली आहे. ही आकडेवारी भयावह आहे. याचा अर्थ विद्यार्थ्यांच्या मनात मोठय़ा प्रमाणात अस्वस्थता आहे. विद्यार्थी हे समाजाचं प्रतीक आहे. म्हणजेच समाज स्वास्थ्य या मुद्दय़ाचा कस लागत आहे.
वर्ल्ड हेल्थ ऑरगॅनायझेशनने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात असं स्पष्ट म्हटलंय की, एकूण जागतिक लोकसंख्येचा विचार करता तब्बल 25 टक्के लोकांना आयुष्यात कधी-कधी मानसिक समस्या भेडसावतात. त्याचं रूपांतर कधी मनोविकारात होतं ते कळतदेखील नाही. मग त्यांना उपचारासाठी मनोविकार तज्ञ किंवा समुपदेशकांकडे जावं लागतं. ही टक्केवारी दिवसेंदिवस वाढत आहे. आपल्या पुढच्या पिढीचा विचार केला तर ही संख्या भयंकर आहे.
प्रोएक्ट माइंड्स गेली काही वर्षे मानसिक आरोग्य या विषयावर काम करत आहे. डिप्रेशन, एन्झायटी, नैराश्य, मानसिक चलबिचल, सिझोफ्रेनिया अशा प्रकारच्या समस्या असणाऱया आलेल्या रुग्णांवर डॉ. अनुपम बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले जाते. मानसिक आरोग्य ही आजच्या काळाची मोठी समस्या आहे. त्यामुळे माइंडफुलनेसची संकल्पना शाळा, कॉलेज, ऑफिस, शासकीय कार्यलय, सेवाभावी संस्था यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी संस्थेद्वारे काम केले जात आहे.
या विषयावर पुढे बोलताना डॉ. राजेंद्र बर्वे म्हणाले, माइंडफुलनेस आणि श्वसनाचे तंत्र यामुळे माणसाचे मन ताजे, टवटवीत, उत्साही राहते, हे संशोधनातून सिद्ध झालेय. माइंडफुलनेस आणि मेडिटेशन यात फरक आहे. तो सूक्ष्म असला तरी तो नीट समजून घेणं आवश्यक आहे. हा फरक नेमका काय आहे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे, असं माझं मत आहे. माइंडफुलनेसचा अभ्यास आणि सराव नियमितपणे केला तर त्याचे अनेक फायदे झालेले दिसून आले आहेत. कामातली एकाग्रता वाढणं, मनशांतीमध्ये वृद्धी, प्रसन्नतेच्या भावनेत वाढ होणं, वर्तणूक संतुलित राहणं, भवतालविषयी सजगता वाढणं, भावभावनांवर नियंत्रण मिळवणे, पूर्वग्रह विरहित स्वकृती हे माइंडफुलनेसचे सहज दिसणारे फायदे आहेत. दररोज वीस मिनिटं या हिशोबने सलग आठ आठवडे सराव केला तर तुमच्या व्यक्तिमत्त्वामध्ये सकारात्मक बदल झालेले दिसून येतात. तुमचे मित्र, कुटुंबीय, सगेसोयरे, जीवनसाथी याची पोचपावती तुम्हाला नक्की देतील, हे मी विश्वासाने सांगू शकतो.



























































