कांदा निर्यातबंदी, दूध दरवाढीवर संसदेत आवाज उठविणार – नीलेश लंके

‘माझ्या मतदारसंघाची भौगोलिक परिस्थिती पाहिली, तर बहुतांशी भाग ग्रामीणबहुल आहे. निवडणुकीदरम्यान कांद्याची निर्यातबंदी आणि दुधाची दरवाढ हे प्रश्न निदर्शनास आले. हे ज्वलंत प्रश्न असून, त्याविरोधात संसदेत आवाज उठविणार आहे,’ असे खासदार नीलेश लंके यांनी नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

लोकसभा निवडणुकीत यश संपादन केल्यानंतर नीलेश लंके हे आज नवी दिल्लीत पोहोचले. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर, प्रमोद मोहिते, डॉ. बाळासाहेब कावरे, नितीन चिकणे, सुभाष शिंदे, रामा तराळ, गौरव भालेकर, सुनील कोकरे उपस्थित होते.

लंके म्हणाले, ‘कांदा, दूधदराबरोबरच पिण्याच्या, शेतीच्या पाण्याचे प्रश्न आहेत. औद्योगिकीकरणाचे प्रश्न आहेत. हे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणार आहे. माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यासाठी दिल्ली नवीनच आहे. कोणताही राजकीय वारसा नसताना केवळ जनतेच्या जीवावर ग्रामपंचायत सदस्य, सरपंच ते खासदारपदापर्यंत पोहोचण्याचा बहुमान मला मिळाला. माझ्यासाठी हा दिवस भाग्याचा आहे,’ असे लंके यांनी सांगितले.

त्यांच्या शुभेच्छा ग्राह्य धरून काम!

डॉ. सुजय विखे यांनी तुम्हाला शुभेच्छा दिल्या का? या प्रश्नावर बोलताना लंके म्हणाले, अद्यापि मला शुभेच्छा आलेल्या नाहीत. शुभेच्छा आल्या नसल्या, तरी त्या ग्राह्य धरून पुढे काम करायचे असल्याचे त्यांनी सांगितले.

जशास तसे उत्तर देऊ शकतो!

लोकसभा निवडणुकीदरम्यान मराठी आणि इंग्रजीचा वाद सुरू झाला होता. त्यासाठी काही धडे लावण्याचा निर्णय घेतलाय का? या प्रश्नावर बोलताना लंके म्हणाले, ‘धडे लावण्याची काही गरज नाही. कोणताही माणूस त्याच्या आईच्या उदरातून शिकून येत नाही. एकदा पाण्यात पडल्यावर पोहायला शिकतोच ना? तशीच ही स्थिती आहे. कुठल्या माणसाला कुठली भाषा अभिप्रेत आहे, तशा भाषेतच मला बोलावे लागणार आहे. मला जो प्रश्न मांडायचा आहे, त्याला माझी भाषाच समजली नसेल, तर मला त्याच भाषेत बोलावे लागेल. त्यासाठी ती भाषा मला शिकावी लागेल. जशास तसे उत्तर मी देऊ शकतो!’