श्रीधर स्वामींसी भेटती वासुदेव गुरुमहाराज…

>> निळकंठ कुलकर्णी 

।। श्री गुरुदेव दत्त ।।

।। श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज ।।

श्री गुरुमहाराजांची व श्रीधर स्वामींची प्रथम भेट श्री क्षेत्र नरसोबावाडी येथे झाली प्रतिवर्षां प्रमाणे महाराज गुरूद्वादशी वाडी करून पुढे तिथेच रहात. १९४७ साली कार्तिक मासापासून पौषअखेर श्रीधर स्वामी वाडीत काही विशिष्ट अनुष्ठानासाठी एकांतवासात होते. कुणाशी फारसा संपर्क नव्हता. स्वामींनी महाराजांच्या विषयी श्री. कर्वे स्वामी ( प.प. प्रज्ञानांनंद सरस्वती ) यांनी सांगितले होते. श्री स्वामींची हकीकत त्यांनी स्वतःच महाराजांना सांगितली असे दिसते. ह्या प्रमाणे परिचय झाल्यावर गुरुमहाराज रोज नियमाने दुपारी ३ ।। ४ वाजता स्वामींच्या दर्शनाला जाऊ लागले व उभयतांच्या निवांत गप्पागोष्टी होऊ लागल्या.

यानंतर दहा वर्षांनी म्हणजे १९५७ च्या डिसेंबर अखेर श्रीधर स्वामी विश्रांतीसाठी लोणावळ्याला आले व त्यांनी भेटीसाठी बोलावले. गुरुमहाराजही त्यावेळी अंथरुणातच होते. हालचाल करण्याचीही डॉक्टरांची मनाई होती. तशाही अवस्थेत एके दिवशी सकाळी महाराज गाडीने लोणावळ्यास गेले. त्यांना येताना पाहून श्रीधर स्वामींनी धावतच पुढे आले व त्यांना कडकडून मिठी मारली. कसे वसे स्वतःला सोडवून गुरुमहाराजांनी स्वामींना चरणस्पर्श पूर्वक नमस्कार केला. तेव्हा महाराजांच्या हाताला धरून स्वामींनी त्यांना आत नेले व सन्मानाने पाटावर बसविले व फळांनी भरलेली टोपली समोर ठेवून आपण पुढे खुर्ची वर बसले व क्षेमकुशल विचारले.

ह्याच वेळी त्यांनी गुरुमहाराजांना प्रतिवर्षी तुळजापूरला जाऊन कुलदेवता तुळजाभवानीची महापूजा करण्याचा आदेश दिला. तो श्री गुरुमहाराजांनी आजीव पाळला. यानंतर उभयतांचे बराच वेळ एकांतात काही बोलणे झाले आणि अत्यंत प्रसन्नतेने त्यांनी निरोप घेतला. निघतांना श्रीधर स्वामींनी पुन्हा गुरुमहाराजांना घट्ट मिठी मारली आणि अभय मुद्रा दाखवून अत्यंत वात्सल्यपूर्ण नजरेने पाहून कानांत काही तरी कुजबुजले.

ही भेट व्हायच्या पहांटेच श्री गुरुमहाराजांनी स्वप्नांत थोरल्या महाराजांचे दर्शन झाले होते व महाराज खुर्चीत बसलेले असून त्यांच्या आसपास कानडी बोलणारी मंडळी आहेत स्वप्नांतच गुरुमहाराजांनी नमस्कार केला, तेव्हा “लोणावळ्यास ये” असा आदेश मिळाला यानंतर ह्या दोन महापुरुषांच्या भेटी वरचेवर झालेल्या दिसतात. १९५८ च्या मार्चमध्ये खंडाळ्याला १९५९ च्या फेब्रुवारीत सोलापूर ४ फेब्रुवारी १९६० रोजी पुणे स्टेशनवर हे दोघे भेटले .

७ एप्रिल १९६२ पासून ५ जून पर्यंत श्रीधर स्वामी पुण्यात मफतलाल बंगल्यात आजारपणासाठी राहिले होते. ह्या काळात गुरुमहाराज रोज बरोबर दुपारी ४ वाजता फळे घेऊन जात असत. महाराज दारांत आले की, लगेच श्रीधर स्वामींना आंत त्यांची आठवण काढावी. १७ में १९६५ च्या रात्री ११ -११ ।। वाजता पु . श्रीधर स्वामी श्री वासुदेवनिवासामध्ये आले गुरुमहाराजांनी त्यांची पाद्यपूजा थाटाने केली आश्रम दाखविला दर्शने इच्छु भक्तांनी आश्रम फुलून गेला दोघेही जणू भावावस्थेत होते.

अनेकदा श्रीधर स्वामींनी गुरुमहाराजांना आलिंगन दिले. दोघांचा एकांतात सवांदही झाला. ह्या प्रसंगी गुरुमहाराजांच्या खोलीत ह्या संतद्वयांच्या भेटीचा एक अनाहूत साक्षीदार होता, तो म्हणजे कल्याणच्या “हर्षेकाकू”! ह्या भेटीच्या वेळी सर्वांना खोलीच्या बाहेर जायला सांगितले होते. पण हर्षेकाकूंना ते ऐकायला आले नाही. त्या समोरच्या कोपऱ्यात उभ्या होत्या सर्वजण बाहेर गेल्यावर दार लावले. तेव्हा त्यांना ह्या दोन महापुरुषांच्या जागी दोन प्रकाशाचे झोत दिसू लागले.

त्यांतील एक ज्योतीत कधी श्रीदत्तप्रभु दिसतात तर लगेच दुसऱ्या ज्योतित काही वेळाने दोन्ही स्थानी दत्तप्रभु दिसू लागले. पुन्हा ते प्रकाशरूप झाले व एकमेकांत मिसळून गेले. काही वेळाने हे सर्व दृश्य जाऊ श्रीधर स्वामी व गुरुमहाराज आपल्या मानवी रूपांत दिसायला लागले. त्यावेळी महाराजांचे लक्ष हर्षेकाकूंकडे गेले व ” तुम्ही इथे कशा थांबला ?” असे म्हणून ते पाहिलेलं ते कुणाला सांगू नये अशी आज्ञा केली. हर्षेकाकूंनी शेवटपर्यंत ही आज्ञा पाळली. अगदी शेवटच्या घटकेला त्यांचे प्रयागचे भाचे श्री गजाननराव पित्रे जवळ होते. त्यांना ही गोष्ट सांगून हर्षेकाकूंनी देह ठेवला.

यावरून केवळ ह्या दोन सत्पुरुषांच्याच नाहीतर श्री समर्थ व श्री दत्त ह्या दोन संप्रदायाच्या संबंधावरही प्रकाश पडतो. १९६७ च्या जानेवारीत श्रीधर स्वामी पुण्याच्या बाहेरूनच जाणार असल्याने गुरुमहाराज त्यांच्या दर्शनासाठी एक मोकळ्या शेत जमिनीतच गेले होते. स्वामींना वेळ लागून ते रात्री ११ ला आले थंडीचे दिवस असल्याने महाराजांना थंडी वाजू नये म्हणून स्वामींनी स्वतः शेकोटी केली. या वेळीही दोघांचे प्रेम उंचबळलेले सर्व उपस्थितांना जाणवत होते. जणू काही ही अखेरची भेट असल्याचे दोघांना ही कळले होते. स्वामींच्या एकनिष्ठ शिष्या व श्री गुरुमहाराजांच्या अनुग्रहित श्री सुशीलाताई मोडक या तिथे उपस्थित होत्या. कलीचा वाढता प्रभाव श्रीधर स्वामींना अस्वस्थ करीत होता. सनातन वैदिक धर्माची व भारतीय संस्कृतीची दूरवस्था पाहवत नव्हती. ह्याचा प्रतिकार करायचा तर आपले तप:सामर्थ्य वाढवायला हवे. ह्यासाठी त्यांना वरदहळ्ळी येथे एकांतवास करायचा होता. निवडक भक्तापुढे त्यांनी बऱ्याच गोष्टी कळकळीने सांगितल्या. त्यांत स्वतःच्या ह्या जन्माविषयी असे म्हटले की, “आम्ही मूळ गाणगापूरचे समर्थ्यांनी आम्हाला सज्जनगडाकडे खेचले.

श्रीधर स्वामी हे समर्थ रामदास स्वामी यांचे शिष्य सज्जनगडावर स्वामीजींनी साधनेबरोबरच समर्थांची सेवा केली आणि सेवेला सुद्धा विलक्षण महत्व दिल आहे. श्रीधर स्वामींनी आर्य संस्कृती नावाचा ग्रंथ लिहिला. आर्य संस्कृती हा स्वामीजींनी लिहिलेला ग्रंथ साधकांना साधनेची दिव्यनुभूती देणारा आहे. महान संत श्रीधर स्वामी महाराजांनी १९७३ साली वरदहळ्ळी (वरदपूर) ता. सागर जि. शिमोगा ( कर्नाटक) यथे महासमाधी घेतली.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या