नीना कुलकर्णी, सुरेश साखवळकर यांना नाटय़ परिषदेचा जीवनगौरव

अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी आणि ज्येष्ठ अभिनेते सुरेश साखवळकर यांना आज जाहीर झाला. पुरस्कार वितरण सोहळा शनिवार, 14 जून रोजी  दुपारी 4 वाजता माटुंगा येथील यशवंत नाटय़ मंदिरात होणार आहे.

दरवर्षी नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनाप्रीत्यर्थ 14 जून रोजी पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात येतो. यावेळी रंगकर्मींना त्यांच्या रंगभूमीवरील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यंदाच्या सोहळ्यात व्यावसायिक नाटय़ पुरस्कारासाठी सर्वोत्कृष्ट लेखक सुनील हरिश्चंद्र व स्मिता दातार (नाटक ः उर्मिलायन), सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक अद्वैत दादरकर (नाटक ः शिकायला गेलो एक), सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये (नाटक ः असेन मी नसेन मी), सर्वोत्कृष्ट प्रकाश योजनाकार शीतल तळपदे (नाटक ः मास्टर माइंड),  सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीतकार निषाद गोलांबरे (नाटक ः वरवरचे वधुवर), सर्वोत्कृष्ट रंगभूषाकार राजेश परब (नाटक ः गोष्ट संयुक्त मानापमानाची), सर्वोत्कृष्ट व्यावसायिक नाटक असेन मी नसेन मी (संस्था ः स्क्रीप्टज क्रिएशन), सर्वोत्कृष्ट अभिनेता सुव्रत जोशी (नाटक ः वरवरचे वधुवर), सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता प्रशांत दामले (नाटक ः शिकायला गेलो एक), सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता हृषिकेश शेलार (नाटक ः शिकायला गेलो एक), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री नीना कुलकर्णी (नाटक ः असेन मी नसेन मी), सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री शर्मिला शिंदे (नाटक ः ज्याची त्याची लव स्टोरी), सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री शुभांगी गोखले (नाटक ः असेन मी नसेन मी) आणि अभिनयासाठी विशेष लक्षवेधी पुरस्कार निहारिका राजदत्त (नाटक ः उर्मिलायन), नाटय़ परिषद युवा नाटय़ पुरस्कार सुशांत शेलार यांना प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय प्रायोगिक नाटकांना आणि त्यांच्या कलावंतांना पुरस्कारांनी गौरवण्यात येईल.