नीरव मोदीच्या आलिशान गाड्यांचा 27 फेबुवारीला लिलाव

nirav-modi-new

हिंदुस्थानातून पळ काढलेला पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार नीरव मोदी याच्याकडे एकाहून एक सरस गाडय़ा आहेत. या आलिशान गाडय़ा जप्त करून त्यांचा लिलाव केला जात आहे. येत्या 27 फेबुवारी रोजी होणाऱया लिलावात नीरव मोदीच्या लक्झरी बॅगा, घडय़ाळे आणि गाडय़ांचा समावेश आहे. त्यामध्ये सगळ्यात महागडय़ा रोल्स रॉएस घोस्ट आणि पोर्शे पॅनामेरा गाडय़ा आहेत. या दोन गाडय़ा याआधीही लिलावात ठेवण्यात आल्या होत्या. मात्र त्यावेळी कोणी खरेदीदार मिळाला नव्हता.

मागील लिलावात रोल्स रॉएस घोस्ट या कारची बोली दीड कोटी रुपयांपासून सुरू करण्यात आली होती. पोर्शे पॅनामेरा कारची बोली 60 लाख रुपयांपासून सुरू झाली होती. 27 फेबुवारी रोजी होणाऱया लिलावात या दोन्ही गाडय़ांची सुरुवातीची बोली रक्कम कमी होण्याची शक्यता आहे.

याआधी नीरव मोदीच्या काही आलिशान गाडय़ांचा लिलाव करण्यात आलेला आहे. मर्सिडीज बेंझ जीएल350 एसयुव्ही या कारची विक्री 37 लाख रुपयांत झाली होती. मोदीजवळ दोन रोल्स रॉएस घोस्ट गाडय़ा होत्या. त्यापैकी एक गाडी गेल्यावर्षी 1.33 कोटी रुपयांना विकण्यात आली. पोर्शे पॅनामेरा गाडीला गेल्या लिलावात 53 लाख रुपयांपर्यंत बोली लावली होती. ही किंमत सक्तवसुली संचालनालयाला कमी वाटल्याने त्यांनी गाडी विकली नव्हती.

नीरव मोदीची रोल्स रॉएल घोस्ट कार 2010 चे मॉडेल आहे. ती ग्रे एक्स्टीरियर कलरमधील गाडी आहे. या कारमध्ये 6.6 लीटर नॅचरल एस्पिरेटेड व्ही 8 पेट्रोल इंजिन असते. हे इंजिन 5250 आरपीएमवर 568 पीएसची ज्यादा पॉवर आणि 1500 आरपीएमवर 820 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करतो.

पोर्शे पॅनामेरामध्ये दोन इंजिन आहेत. त्यामध्ये एक 4 लीटरचे ट्विन टर्बो व्ही 8 इंजिन असते, त्यातून 549 पीएस पॉवर आणि 770 एनएमचा टॉर्क जनरेट होतो. तर दुसरे इंजिन इलेक्ट्रिक मोटरचे असते. यामध्ये साधारण इंजिनापेक्षा जास्त 677 पीएस पॉवर आणि 850 एनएमचे टॉर्क जनरेट केला जातो.

– अंमलबजावणी संचालनालयाने नीरव मोदीच्या संपत्तीचा लिलाव करून 54.84 कोटी रुपये जमवले होते. यानंतर एक लिलाव 3 आणि 4 मार्च रोजी होणार आहे. दोन्ही लिलावांत देशातील कलाकारांच्या जबरदस्त 15 कलाकृतींचा समावेश असणार आहे. व्ही. एस. गायतोंडे यासारख्या कलाकारांच्या कलाकृतींचा समावेश आहे. यात 1935 मध्ये अमृता शेरगिल यांनी बनवलेला मास्टरपीस आहे. दोन्ही लिलावांसाठी एक कॅटलॉग तयार करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या