#Nirbhaya दोषींची जीव वाचवण्याची शर्थ, तिहार जेलविरुद्ध याचिका दाखल 

1945

अवघा देश ढवळून काढणाऱ्या निर्भया प्रकरणातील दोषी फाशीच्या शिक्षेपासून वाचण्याची शर्थ करत आहेत. वेगवेगळ्या याचिका दाखल करून फाशीला विलंब करून झाल्यानंतर आता पुन्हा एकदा दोषींतर्फे एक याचिका दाखल करण्यात आली आहे. दोषींचे वकील ए. पी. सिंह यांनी पतियाळा कोर्टात तिहार कारागृहाविरुद्ध याचिका दाखल केली आहे.

निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींना 22 जानेवारी फाशी होणार होती. मात्र त्यानंतर 1 फेब्रुवारी रोजी फाशीची तारीख निश्चित करण्यात आली असून या चारही जणांविरुद्ध डेथ वॉरंट जारी करण्यात आलं आहे. मात्र वकील ए.पी. सिंह यांना विनय आणि अक्षय यांच्या दया याचिका दाखल करायच्या आहेत. मात्र तिहार कारागृह प्रशासनाकडून त्यांना आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता झाली नसल्याचा आरोप सिंह यांनी केला आहे. त्यामुळे तिहार कारागृहाविरुद्ध त्यांनी पतियाळा कोर्टात याचिका दाखल केली आहे.

16 डिसेंबर 2012 रोजी दिल्लीत सहा जणांनी निर्भयावर सामूहिक बलात्कार आणि अनन्वित शारीरिक मारहाण केली होती. या घटनेनंतर उपचार सुरू असताना निर्भयाचा 29 डिसेंबर 2012 रोजी मृत्यू झाला होता. या प्रकरणात एकूण सहा जणांवर आरोप होते. त्यातील एक असलेल्या राम सिंह याने तुरुंगातच गळफास लावून आत्महत्या केली होती. तर एका अल्पवयीन आरोपीची रवानगी सुधारगृहात करण्यात आली होती. या प्रकरणातील उर्वरित दोषी अक्षय, पवन, मुकेश आणि विनय यांच्यावरील आरोप सिद्ध झाले आहेत.

न्यायाधीशाची बदली
निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील चार आरोपींना फाशीची शिक्षा सुनावणारे न्यायाधीशांची बदली करण्यात आली होती. अतिरिक्त सत्र न्यायाधिश सतीश कुमार अरोरा यांना एका वर्षासाठी अतिरिक्त रजिस्ट्रारच्या रुपात सर्वोच्च न्यायालयात बदली करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या