मोदी सरकारडून पुन्हा महाराष्ट्रावर अन्याय, पहिल्याच निधी वाटपात बिहारला मिळाले दुप्पट पैसे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी तिसऱ्यांदा केंद्रात सत्तास्थापन केली. महाराष्ट्रातून भाजपला या लोकसभा निवडणूकीत हवे तसे यश मिळाले नाही. भाजपच्या तब्बल 18 जागा या निवडणूकीत घटल्या. तर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जदयूच्या टेकूवर नरेंद्र मोदी यांनी केंद्रात सत्तास्थापन केले. त्यामुळे सत्तास्थापने नंतरच्या पहिल्यांच निधी वाटपात महाराष्ट्रावर पुन्हा अन्याय झाल्याचे दिसून आले आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थमंत्रालयाचा पुन्हा एकदा पदभार स्वीकारल्यानंतर पहिला निर्णय हा राज्यांच्या निधी वाटपाचा घेतला. या निधी वाटपात सर्वाधिक निधी हा उत्तर प्रदेशला मिळाला. उत्तर प्रदेशला 25069 कोटींचे पॅकेज मिळाले. त्याखालोखाल मोदींच्या सत्तास्थापनेला टेकू दिलेल्या बिहारला 14056 कोटी रुपये दिले गेले. तर सर्वात जास्त जीएसटीचे करसंकलन करणाऱ्या महाराष्ट्राला निर्मला सितारामन यांनी 8828 कोटी रुपये दिले. त्यामुळे पुन्हा एकदा केंद्र सरकारने महाराष्ट्रावर अन्याय केल्याचे समोर आले आहे.

पश्चिम बंगालला 10553 कोटी रुपये, महाराष्ट्राला 8828 कोटी रुपये देण्यात आले आहेत. राजस्थानला 8421 कोटी, ओडिशाला 6327 कोटी, तमिळनाडूला 5700 कोटी, आंध्र प्रदेशला 5655 कोटी, गुजरातला 4860 कोटी रुपये देण्यात आलेले आहेत.