‘निसर्ग’ चक्रीवादळ धडकणार, मुंबईत उद्यापासून मुसळधार!

1287

‘निसर्ग’ चक्रीवादळ 3 जून रोजी महाराष्ट्र आणि गुजरातच्या समुद्र किनार्‍यावर धडकणार असल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यातच अरबी समुद्राच्या आग्नेय दिशेसह पूर्व-मध्य अरबी समुद्र आणि लक्षद्विपजवळ कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे मुंबई, ठाणे, रायगडसह पश्चिम किनारपट्टीवर उद्यापासून दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे सरकारनेही पालिकेच्या आपत्कालीन विभागाला अलर्ट राहण्याचे निर्देशही दिले आहेत.

हवामान खात्याच्या इशार्‍यानुसार सोमवारी किनारपट्टीवर चक्रीवादळ धडकणार आहे. रायगड आणि दमण यामधील सुमारे 260 किमी परिसरावर परिणाम होणार असल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. यामुळे मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पनवेल, कल्याण, डोंबिवली, मिरा भाईंदर, वसई-विरार, उल्हासनगर, बदलापूर आणि अंबरनाथ या भागावर परिणाम होण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे. 2 जूनपासून सक्रिय होणार्‍या या वादळाच्या वार्‍याचा वेग 3 जून रोजी सायंकाळी प्रतितास 105 ते 110 किमी इतका असणार आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनांनी आवश्यक खबरदारी घ्यावी असे हवामान विभागाकडून कळविण्यात आले आहे.

महाराष्ट्रात एनडीआरएफ
चक्री वादळाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरणाची बैठक घेऊन उपाययोजनाही केल्या आहेत. यामध्ये एनडीआरएफच्या 9 टीम महाराष्ट्रात पाठवण्यात आल्या आहेत. यामध्ये मुंबईत 3, पालघरमध्ये 2, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये प्रत्येकी एक टीम तैनात ठेवण्यात आली आहे.

चौपाट्यांवर पालिकेची सुरक्षा टाइट!
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याच्या अलर्टच्या पार्श्वभूमीवर सर्व चौपाट्यांवर सुरक्षा व्यवस्था तैनात ठेवण्यात आली आहे. यामध्ये गिरगाव, दादर, जुहू, मालाड, अक्सा, गोराई आदी चौपाट्यांवर लाइफ गार्ड बोटी, जेटकी आणि सुरक्षा साधनांसह तैनात ठेवण्यात आले आहेत. शिवाय नरिमन पॉइंट, वांद्रे, अंधेरी, मालाड, बोरिवली अशा सर्व फायर स्टेशन्सवर अग्निशमन दलाचे 130 प्रशिक्षण घेतलेले जवानही आवश्यक साधनसामग्रीसह तैनात ठेवण्यात आले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या