
मीरा-भाईंदर महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला मतदान केले तरच तुमचे प्रश्न सोडवू, अशी धमकीच मत्स्य व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी मच्छीमारांना दिली आहे. उत्तनच्या प्रचार सभेत बोलताना त्यांनी ही दमबाजी केली असून त्यामुळे येथील मच्छीमारांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
उत्तन येथे महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी मंगळवारी भाजपची जाहीर सभा पार पडली. यावेळी व्यासपीठावर भाजपचे स्थानिक नेतेदेखील उपस्थित होते. सभेसाठी मच्छीमार बांधव आल्याचे दिसताच नितेश राणे यांनी स्थानिक प्रश्नांबाबत बोलायला सुरुवात केली. मात्र हे प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतील तर आधी भाजपला मतदान करा असा इशाराच दिला.
नितेश राणे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, तुमचे प्रश्न सोडवू, असा शब्द मी देतो, तर दुसरीकडे तुम्ही जर मतदान केले तर, माझा स्वभाव तुम्हाला माहीत आहे. मच्छी मार्केट बनवण्याचे अधिकार माझ्याकडे आहेत. बंदर कुठे हवे ते सांगा. कोळीवाडय़ाचा प्रश्नही सोडवू. आमच्याकडेच फक्त असे प्रश्न सोडवण्याचे व्हॅक्सिन आहे. बाकी सर्वजण फुस फुस करीत बसतात. आचारसंहिता संपली की मासळी मार्केटचे भूमिपूजन करून टाकू, पण मीरा-भाईंदर पालिका निवडणुकीत आधी भाजपला मतदान करा असे राणे यांनी सांगितले.
मत्स्य विभागाचे सहाय्यक आयुक्त दिनेश पाटील व्यासपीठावर
उत्तनमध्ये झालेल्या भाजपच्या निवडणूक प्रचार सभेत व्यासपीठावर मंत्री नितेश राणे यांनी मत्स्य विभागाचे सहाय्यक आयुक्त दिनेश पाटील यांनाच आणले होते. आयुक्त पदावरील सरकारी अधिकाऱयाला प्रचार सभेत आणणे हे निवडणुकीच्या आचारसंहितेत बसते का, याची चर्चा मीरा-भाईंदरमध्ये सुरू आहे.




























































