
प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल कसे करावे, याचा वस्तुपाठ शंभुराजे यांनी घालून दिला. 14 मे 1657 रोजी जन्मलेल्या या बाळाचे ‘संभाजीराजे’ असे नामकरण जिजाऊ माँसाहेब यांनी केले होते. दोन वर्षांचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले. ‘स्वराज्यासाठी कसे जगावे हे छत्रपती शिवाजी महाराज यांनी जगाला दाखवले; तर देश-धर्मासाठी कसे मरावे हे शंभुराजे यांनी जगाला शिकवले,’ असे प्रतिपादन व्याख्याते प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांनी केले.
जय भवानी तरुण मंडळ आयोजित शिव-फुले-शाहू-आंबेडकर-लोकमान्य व्याख्यानमालेत ‘छत्रपती संभाजी महाराज : धगधगती अंगारगाथा’ या विषयावर प्रा. बानुगडे-पाटील बोलत होते. सागर धुमाळ, भगवान पठारे, नारायण बहिरवाडे, नरेंद्र बनसोडे, आदित्य हजारे, राजू दुर्गे, आयुष निंबारकर, भावेश भोजने, मारुती भापकर उपस्थित होते.
प्रा. बानुगडे-पाटील म्हणाले की, ‘आग्रा येथून सुटका करून घेताना शत्रूची दिशाभूल करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी शंभुराजे यांचे निधन झाल्याची खोटी वार्ता प्रसूत केली. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सोपविलेली प्रत्येक जबाबदारी शंभुराजे यांनी चोखपणे पार पाडली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर शंभुराजे यांच्या विरोधात कारस्थान रचण्यात आले, परंतु हंबीरराव यांनी ते हाणून पाडले. त्यांच्यावर तीन वेळा विषप्रयोग करण्यात आला.
छत्रपती झाल्यानंतर शंभुराजे यांनी बुऱ्हाणपूर लुटल्यावर शंभुराजे यांना पराभूत केल्याशिवाय डोक्यावर बादशाही पगडी घालणार नाही, अशी प्रतिज्ञा औरंगजेबाने केली; पण ती संधी त्याला मिळाली नाही. दुर्दैवाने परिस्थितीने शंभुराजे यांना साथ दिली नाही; आणि त्यांना कैद झाली. अनन्वित अत्याचार आणि अवहेलना सोसून त्यांनी बलिदान दिले; नाट्य-चित्रपटसृष्टीतून त्यांचा बदनामीकारक इतिहास रंगवला गेला. पण, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चारित्र्याइतकेच शंभुराजे यांचे चारित्र्य स्वच्छ होते’, असेही त्यांनी सांगितले.
प्रकाश हगवणे, राम नलावडे, शरद थोरात, विक्रम पवार, जितेंद्र छाबडा यांनी संयोजनात सहकार्य केले. राजेंद्र घावटे यांनी सूत्रसंचालन केले. मारुती भापकर यांनी आभार मानले.