
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात इराणमधील त्या धक्कादायक घटनेचा थरार सांगितला आहे. हमासचा राजकीय प्रमुख इस्माईल हनिये याच्या हत्येच्या अवघ्या काही तास आधी आपली त्याची भेट झाली होती, असा खुलासा गडकरींनी केला आहे.
नितीन गडकरी यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेवरून ते इराणचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्या शपथविधी सोहळ्याला भारताचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहण्यासाठी तेहरानला गेले होते. शपथविधीपूर्वी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये विविध देशांचे राष्ट्रप्रमुख चहा-कॉफीसाठी एकत्र आले होते, तिथे हनिये देखील उपस्थित होता.
‘मी हनियेला शपथविधी सोहळ्याला जाताना पाहिले. कार्यक्रम संपवून मी हॉटेलवर परतलो. मात्र, पहाटे ४ च्या सुमारास इराणच्या राजदूतांनी मला तातडीने उठवले आणि सांगितले की आपल्याला इथून निघावे लागेल. मी विचारले काय झाले? तेव्हा त्यांनी सांगितले की, हमास प्रमुखाची हत्या झाली आहे. हे ऐकून मला मोठा धक्का बसला’, असे गडकरींनी नमूद केले.
कशी झाली हत्या?
३१ जुलै रोजी पहाटे १:१५ च्या सुमारास इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ (IRGC) च्या अत्यंत सुरक्षित मिलिटरी गेस्ट हाऊसमध्ये हनियेची हत्या करण्यात आली. गडकरींनी सांगितले की, हनियेच्या मृत्यूबाबत अद्यापही अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. कोणी म्हणते की मोबाईल ट्रॅक झाल्यामुळे तो मारला गेला, तर कोणी अन्य कारणे सांगत आहे.
यावेळी गडकरींनी इस्रायलचे उदाहरण देत सांगितले की, जर एखादा देश सामर्थ्यवान असेल, तर कोणीही त्याच्यावर हात टाकण्याची हिंमत करत नाही. इस्रायलसारख्या छोट्या देशाने आपल्या तंत्रज्ञान आणि लष्करी क्षमतेच्या जोरावर जगात आपले स्थान निर्माण केले आहे.
मोसादचा कट?
काही आंतरराष्ट्रीय मीडिया रिपोर्ट्सनुसार, इस्रायलची गुप्तचर संस्था ‘मोसाद’ने इराणमधीलच सुरक्षा यंत्रणेतील काही लोकांच्या मदतीने हनिये राहत असलेल्या खोलीत स्फोटके पेरली होती आणि रिमोटद्वारे हा स्फोट घडवून आणला होता.





























































