अनुभवाने सांगतो, ड्रायव्हरचे डोळे खासगी डॉक्टरकडूनच तपासून घ्या! – गडकरी

अनुभवाने सांगतो, तुम्हाला जर ड्रायव्हरचे डोळे तपासायचे असेल तर खासगी डॉक्टरकडूनच तपासून घ्या. सरकारी डॉक्टर चुकीचा रिपोर्ट देतात, असा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना दिला. या विधानामुळे हास्याची खसखस पिकली मात्र गदारोळ होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

रस्ते सुरक्षा सप्ताहानिमित्त विज्ञान भवनात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी आपल्या नर्मविनोदी शैलीत भाषण करत किस्से ऐकवले. महाराष्ट्रात विरोधी पक्षात असताना मी रेड लाईट कारमधून चाललो होतो. पूर्ण पोलीस बंदोबस्तात माझा ताफा निघाला होता. माझ्या ड्रायव्हरला मोतिबिंदू झाल्याचे मला नंतर कळाले. एका मुख्यमंत्र्यांच्या ड्रायव्हरच्या दोन्ही डोळ्यांची दृष्टी गेलेली होती. तर एका केंद्रीय मंत्र्याच्या एका ड्रायव्हरचा एक डोळा खराब झालेला आढळून आले, असे गडकरी म्हणाले आणि सभागृहात हास्यकल्लोळ उडाला.

ते पुढे म्हणाले की, मी अनुभवाने सर्व मंत्र्यांना आणि राजनाथ सिंह यांनाही सांगतो, तुम्ही सर्व तुमच्या ड्रायव्हरच्या डोळ्यांची तपासणी खासगी डॉक्टरकडून करून घ्या. एखाद्या ड्रायव्हरला डोळ्याचा त्रास जाणवल्यास तो सर्टिफिकेट घेऊन येतो.

आपली प्रतिक्रिया द्या