निधीअभावी शेंद्रा-बिडकीन डीएमआयसीला जोडणारा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पातून वगळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्ली-मुंबई इंडस्ट्रिज कॉरिडोरच्या शेंद्रा-बिडकीन या दोन नोडला जाणारा चारपदरी रस्ता भारतमालेच्या पहिल्या टप्प्यात प्रस्तावित करण्यात आला होता. परंतु राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आता हा रस्ता वाहतूक नसल्याचे कारण देत यातून वगळला आहे. त्यामुळे बिडकीनमधील गुंतवणूक धोक्यात आली आहे. केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी डीएमआयसीला जोडणारा हा रस्ता तयार केला जाणार नसून तात्पुरत्या स्वरूपात सोलापूर-धुळे महामार्गाच्या बासपासवरुन 13 किमी अंतराला जोडणारा रस्ता तयार केला जाणार असल्याचे सांगितले.

केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी मराठवाडयातील राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाच्या कामांचा आढावा घेतला. यावेळी केंद्रीय उद्योग सचिव राममनोहर मिश्रा, विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, आमदार हरिभाऊ बागडे, बबनराव लोणीकर, अतुल सावे, संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. शेंद्रा-बिडकीन डीएमआयसीच्या दोन नोडमध्ये सध्या मोठया प्रमाणावर गुंतवणूक होत आहे. शेंद्राच्या ऑरिक सिटीमध्ये 6 हजार कोटींची गुंतवणूक झाली असून बिडकीनच्या नोडमध्येही सुमारे 6 हजार कोटींची गुंतवणूक प्रस्तावित आहे. मुलभूत सोयी सुविधांची कामे अंतीम टप्प्यात आहे. शेंद्रा-बिडकीन डीएमआयसीला जोडणारा रस्ता तयार करण्यासाठी भारतमालेच्या पहिल्या टप्प्यात हा रस्ता प्रस्तावित होता. परंतु राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरणाकडे निधी उपलब्ध नसल्यामुळे शेंद्रा-बिडकीनला जोडणारा रस्ता वगळण्यात आला. या रस्त्याचा विषय चर्चेला येताच गडकरी म्हणाले, सध्या रस्त्यांची अपूर्ण कामे पूर्ण करण्यावर भर दिला जात असून एकही नवीन रस्ता घेतला जाणार नाही. शेंद्रा-बिडकीन या दोन्ही नोडला जोडणारा रस्ता सध्या वाहतूक नसल्याने विचारात घेण्यात आलेला नाही. सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गाच्या बायपासचे काम हाती घेण्यात आले आहे. यापासून डीएमआयसी 13 किमी अंतरावर असल्यामुळे तात्पुरत्या स्वरुपात 13 किमी रस्त्याचे काम करुन दिले जाईल. ज्यावेळी या रस्त्यावर वाहतूक वाढेल तेव्हा या रस्त्याचा विचार करण्यात येईल असेही गडकरी म्हणाले.

जालना रोडसाठी 74 कोटीचा निधी मंजूर
विमानतळ ते नगरनाका दरम्यान जालना रोडचा विस्तार करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अनेक अडचणींवर मात करीत या रस्त्यांसाठी 74 कोटींचा निधी मंजूर केला असून निविदा अंतीम करुन 16 जानेवारीपासून रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्याचे आदेश दिले जाणार आहेत. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी या रस्त्यासाठी पाठपुरावा केला होता. त्यांच्या आग्रहास्तव हा रस्ता तयार केला जात असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले.

पूर्णा नदीवर बंधारा उभारणार
नांदेड ते परभणी हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मंजूर केला आहे. या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले. या रस्त्यावर पूर्णा नदीपात्रात पूल उभारला जाणार असून त्यावर दरवाजे बसवून बंधारा बांधण्यात यावा अशी मागणी विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी केली. यावर गडकरी यांनी बंधारा बांधण्यास सहमती दर्शवली. राज्य सरकारला या संदर्भात पत्रव्यवहार करण्याची सूचना केली.