
देशातील प्रत्येक समस्येला पंडित नेहरूच जबाबदार असल्याचे दावे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा संसदेत करत असताना केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी आज गांधी-नेहरूंच्या धोरणांचे जाहीर काwतुक केले. सर्वसमावेशक विकासाबद्दल बोलताना गडकरी यांनी नेहरू-गांधी यांच्या दूरदृष्टीचा दाखला दिला.
हिंदुस्थानी उद्योग महासंघाने नागपूरमध्ये आयोजित केलेल्या परिषदेत ते बोलत होते. ‘विदर्भाच्या आकांक्षा विकासासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. कृषी व उद्योग क्षेत्राचा विकास झाल्यास विदर्भ सुखी व समृद्ध होईल, असे सांगताना गडकरी यांनी गांधीजी आणि नेहरूंच्या विचारांचा दाखला दिला.’ ‘पंडित नेहरू म्हणायचे की, आम्हाला जास्तीत जास्त उत्पादन घेण्याची गरज आहे, तर गांधीजी म्हणायचे आम्हाला जास्तीत जास्त लोकांच्या सहभागासह जास्तीत जास्त उत्पादन घेण्याची गरज आहे. या दोन्ही गोष्टी आज गरजेच्या आहेत. रोजगार निर्मितीला सर्वात पहिले प्राधान्य असायला हवे, असे गडकरी यावेळी म्हणाले.’