
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
मोठमोठी स्वप्ने दाखवणारे नेते जनतेला सुरुवातीला चांगले वाटतात; पण ती स्वप्ने खरी करून दाखवता आली नाहीत तर लोक झोडपून काढतात, असे ज्येष्ठ भाजप नेते, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज ‘अच्छे दिन फेम’ भाजप नेत्यांनाच सुनावले. ते नागपूर येथील एका कार्यक्रमात बोलत होते. गडकरी यांनी गेल्या काही दिवसांपासून कोणाचाही मुलाहिजा न ठेवता आपल्या जिभेचा दांडपट्टा सुरूच ठेवला आहे.
राजकारणात अपयशाची जबाबदारी घेणारे नेतृत्व हवे. अपयशाची जबाबदारी पक्षाच्या अध्यक्षाचीच असते. आत्मविश्वास आणि अहंकार यातला फरक ओळखा. आत्मविश्वास नक्कीच हवा, पण अहंकाराला दूर ठेवा. आमच्या नेत्यांच्या तोंडात बोळा कोंबण्याची गरज आहे. आम्ही सत्तेवर कदापिही येणार नाही, असा आमचा समज पक्का होता. त्यामुळे वारेमाप आश्वासने देण्याचा ‘सल्ला’ आम्हाला देण्यात आला होता. तेच आम्ही 2014च्या लोकसभा निवडणुकीत केले. लोक आता अनेक आश्वासनांची आठवण पदोपदी करून देतात; पण आम्ही फक्त हसतो आणि पुढे निघून जातो.






















































