केंद्राने बिनव्याजी कर्ज दिल्यास लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करणार

1849

लॉकडाऊन काळात आलेल्या वाढीव वीज बिलाबाबत ग्राहक संताप व्यक्त करत असतानाच उर्जामंत्र्यांनी आज वीज बिल माफीचे संकेत दिले आहेत. वीज बिलाची वसुली रोडवल्याने महावितरण आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. मात्र केंद्र सरकारने ऊर्जा विभागाला पुरेसे बिनव्याजी कर्ज दिल्यास किंवा अनुदान दिल्यास लॉक डाऊन काळातील वीज बिल माफ केले जाईल असे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

केंद्र सरकारने महावितरणला दहा हजार कोटी रुपयांचे अनुदान द्यावे अशी मागणी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी गुरुवारी केंद्रीय उर्जामंत्र्यांकडे केली आहे. सध्या राज्यातील वीज ग्राहकांना वीज बिलात सवलत देणे आवश्यक आहे.

वीज सुधारणा विधेयक घटनाविरोधी
केंद्राच्या प्रस्तावित वीज सुधारणा विधेयकावर चर्चा करण्यासाठी आज केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंग यांच्या उपस्थितीत विविध राज्याचे मुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री यांची व्हिडीओ कॉन्फरन्स बैठक आयोजित केली होती. यावेळी बोलताना केंद्राचे प्रस्तावित विधेयक घटनाविरोधी असल्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी स्पष्ट केले. या विधेयकामुळे राज्यांच्या अधिकारावर अतिक्रमण होणार असून घटनेतील संघराज्याच्या व्यवस्थेला सुरुंग लागणार आहे. त्यामुळे यावर निर्णय घेताना सर्वंकष विचार करावा असेही राऊत म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या