फडणवीसांच्या काळातील 6500 कोटींच्या कामांची चौकशी; ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जलयुक्त शिवार योजनेतील कामांची चौकशी सुरू असतानाच आता तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात ऊर्जा विभागात झालेल्या 6 हजार 500 कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधाच्या विकासकामांमधील अनियमिततेची चौकशी करण्याचे आदेश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले आहेत.

या कामांची चौकशी करण्यासाठी सहा जणांची चौकशी समिती नेमण्यात आली आहे. महावितरणचे वित्त संचालक रवींद्र सावंत हे या समितीचे अध्यक्ष असतील. या समितीमध्ये महावितरणचे संचलन संचालक, प्रकल्प संचालक, पायाभूत सुविधांचे मुख्य अभियंता, परिमंडळाचे मुख्य अभियंता, महावितरणचे कार्यकारी संचालक (संचलन) यांचा समावेश आहे.

कोणत्या काळातील कामांची चौकशी

राज्यातील 2014 ते 2019 या पाच वर्षांच्या काळातील विद्युत विभागातील कामांची चौकशी होणार आहे.

अनियमितता आढळली

राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर महावितरणच्या क्षेत्रीय कार्यालयांकडून दोन वर्षांत 3 हजार 387 कोटी रुपयांच्या कामाचे प्रस्ताव ऊर्जा विभागाला सादर झाले. या आधी 19 हजार हजार कोटी रुपयांची कामे झालेली असताना पुन्हा त्याच पद्धतीची कामे येत असल्याचे निदर्शनास आले तेव्हा ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी या सर्व कामांची चाचपणी करण्याच्या सूचना केल्या तेव्हा अनेक कामांमध्ये अनियमितता आढळून आली. नाशिकमध्ये एक काम यापूर्वीच अन्य एका योजनेत झाल्याचे दाखवले असताना पुन्हा तेच काम दाखवण्यात आले. स्थानिक कंत्राटदार महावितरणच्या स्थानिक अधिकाऱयांनी सुमारे दोन कोटी रुपयांची बनावट बिले तयार केल्याचे महावितरणच्या अधिकाऱयांच्या लक्षात आले. त्याची माहिती सादर होताच डॉ. नितीन राऊत यांनी या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधितांवर कारवाईचे आदेश दिले.