जदयुच्या आमदार, खासदारांची आज महत्त्वाची बैठक, नितीश कुमार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिहारमध्ये सत्ताधारी जदयु आणि भाजपमधील अंतर्गत शीतयुद्ध हळूहळू प्रकर्षाने चव्हाटय़ावर येऊ लागले आहे. जदयुचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सोमवारी पाटण्यामध्ये पक्षाच्या सर्व आमदार व खासदारांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. यावेळी राज्य तसेच पेंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीबाबत (एनडीए) मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जदयुच्या या बैठकीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

माजी पेंद्रीय मंत्री आणि जदयुचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आरसीपी सिंह यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर बिहारमधील राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. याचदरम्यान नितीश कुमार यांनी पक्षाच्या सर्व आमदार आणि खासदारांना बैठकीसाठी सोमवार सायंकाळपर्यंत पाटण्यात येण्याच्या सूचना केल्या आहेत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह हेदेखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. बिहारमध्ये एकत्र सत्तेत असूनही भाजप आणि जदयुमध्ये मतभेद आहेत. या दोन पक्षांतील सुसंवाद बिघडल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपसोबतच्या भविष्यातील आघाडीबाबत सोमवारच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

केंद्रीय कॅबिनेटमध्ये सहभागी  होण्याचा प्रश्नच येत नाही! – ललन सिंह यांचा भाजपला टोला 

  • जदयुचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आरसीपी सिंह यांच्या राजीनाम्यानंतर पक्षाचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह यांनी रविवारी मोठे विधान केले. आता पेंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी होण्याचा प्रश्नच येत नाही, असे स्पष्ट मत व्यक्त करीत सिंह यांनी अप्रत्यक्षपणे भाजपप्रति नाराजी प्रकट केली. त्यामुळे ‘एनडीए’मध्ये ‘ऑल इज वेल’ नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
  • बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या जदयुच्या आमदारांची संख्या 43 वर खाली आली आहे. जनाधार कमी झाल्यामुळे ही संख्या कमी झालेली नाही, तर यामागे केवळ कट-कारस्थान हेच कारण आहे. आता मात्र नितीश कुमार यांचा पक्ष तशा कट-कारस्थानांबाबत पूर्णपणे सतर्क झाला आहे. आता कुठलाही कट किंवा कारस्थान येथे यशस्वी होणार नाही, असा टोला ललन सिंह यांनी भाजपचे नाव न घेता लगावला. त्यांच्या या भूमिकेमुळे पेंद्रातील एनडीएमध्ये तणाव वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

नितीश कुमार भाजपपासून दूरच; नीती आयोगाच्या बैठकीला दांडी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी राजधानी दिल्लीत नीती आयोगाची बैठक झाली. या बैठकीला नितीश कुमार गैरहजर राहिले. कोरोना संसर्गातून ते नुकतेच बरे झाले आहेत. त्यांची प्रकृती पूर्णपणे बरी झाली नसल्यामुळे ते नीती आयोगाच्या बैठकीला हजर राहू शकले नसल्याचे सांगण्यात आले. मात्र याआधीही त्यांनी भाजपपासून चार हात दूरच राहणे पसंत केले आहे. नुकताच बिहारमध्ये भाजपच्या दोन नेत्यांनी रोड शो केला. त्यासह भाजपच्या इतर कार्यक्रम व बैठकांकडेही नितीश कुमार यांनी पाठ फिरवली होती.