
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत नोकरीनिमित्त येणाऱ्या महिलांची निवासाची सोय व्हावी यासाठी म्हाडा तब्बल 83 कोटी रुपये खर्चून ताडदेव येथे 21 मजली भव्य वसतिगृह उभारणार आहे, मात्र म्हाडाच्या जाचक अटीमुळे या वसतिगृहाच्या उभारणीसाठी ठेकेदारच मिळत नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे काही नियम आणि अटीत बदल करून नव्याने निविदा काढण्याची वेळ म्हाडावर आली आहे.
नोकरी आणि शिक्षणानिमित्त राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या महिला आणि मुलींसाठी म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाकडून ताडदेव येथील एम. पी. मिल कंपाऊंडमध्ये 13,298 चौरस मीटर एवढे चटई क्षेत्रफळाचे वसतिगृह उभारण्याची निर्णय म्हाडाने चार महिन्यांपूर्वी घेत कंत्राटदाराच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू केली होती.



























































