धारावी बनतेय ‘नो पेशंट झोन’

कोरोनाला रोखण्यासाठी वाढवण्यात आलेल्या कोरोना चाचण्या आणि लसीकरणामुळे पहिल्या लाटेत पंटेनमेंट झोनचे आगार बनलेली धारावी आता दुसऱया लाटेत मात्र ‘नो पेशंट झोन’ बनत आहे. धारावीत आज दिवसभरात एकही रुग्ण सापडला नसून जून महिन्यात आतापर्यंत तिसऱयांदा रुग्णसंख्या शून्यावर आली आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महापालिका अहोरात्र मेहनत घेत असून कोरोना चाचण्या आणि लसीकरणावर भर देत आहे. त्याचबरोबर जनजागृती तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना याची कठोरपणे अंमलबजावणी सुरू आहे. धारावीला पहिल्या लाटेत जबरदस्त तडाखा बसल्यानंतर त्या अनुभवातून तावून सुलाखून निघालेल्या धारावीने दुसरी लाट
अंगावर येण्याआधीच खबरदारीच्या उपाययोजना अमलात आणल्या. पहिल्या लाटेपासून सुरू असलेले ‘मिशन धारावी’चे मॉडेल सुरू ठेवले. ‘धारावी मॉडेल’नुसार ट्रेसिंग, ट्रकिंग, टेस्टिंग आणि ट्रिटिंग या 4 टी वर भर देण्यात आला आणि हेच मॉडेल दुसऱया लाटेतही कायम आहे. त्याचबरोबर मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतराचे नियम काटेकोरपणे पाळले जात आहेत. त्यामुळे धारावीत आज एकही रुग्ण सापडला नाही तर केवळ 10 सक्रिय रुग्ण आहेत.

दरम्यान, दादरमध्ये दिवसभरात 4 रुग्ण आणि 133 सक्रिय रुग्ण आहेत तर माहीममध्ये 4 रुग्ण सापडले आणि 93 सक्रिय रुग्ण आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या