राज्यातील कारखान्यांकडे ३५ लाख मेट्रिक टन साखर मागणीविना पडून

सामना प्रतिनिधी । मुंबई

कुणी साखर घेता का साखर असे म्हणण्याची वेळ आता राज्यातील साखर कारखान्यांवर आली आहे. २०१७-१८ या वर्षात राज्यात तब्बल १०७ लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन झाले होते, मात्र साखरेला फारशी मागणी नसल्याने कारखान्यांकडे सध्या ३५ लाख मेट्रिक टन साखर पडून आहे. नवा गाळप हंगाम तोंडावर आलेला असतानाच मोठय़ा प्रमाणात साखर गोडाऊनमध्ये पडून असल्याने कारखान्यांचे टेन्शन वाढले आहे. या साखरेचे काय करायचे, नव्याने उत्पादित होणारी साखर कुठे ठेवायची असा प्रश्न साखर कारखान्यांसमोर उभा राहिला आहे.

राज्यातील १८७ सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांनी मागील गळीत हंगामात विक्रमी साखर उत्पादन केले होते. मात्र सध्या साखरेला देशांतर्गत बाजारात उत्पादनाच्या तुलनेत कमी मागणी आहे, तर आंतरराष्ट्रीय बाजारात प्रति क्विंटलला २००० रुपये एवढा कमी दर मिळत असून सरकारने निर्यात अनुदानाही बंद केले आहे. त्यामुळे साखर निर्यात करणे तोटय़ाचे झाले आहे. त्यामुळे कारखान्यांकडे मोठय़ा प्रमाणात साखर पडून आहे. त्यातच नोव्हेंबरपासून गाळप हंगामात साखरेचे उत्पादन ११२ लाख मेट्रिक टनापर्यंत जाण्याची शक्यात असल्याने सध्या उपलब्ध असलेल्या गोड साखरेमुळे कारखान्यांचे तोंड कडू झाले आहे.

केंद्राच्या बफर स्टॉकचा फारसा फायदा नाही
साखर उद्योगासमोरील समस्या सोडवण्यासाठी केंद्र सरकारने देशातील ३० लाख मेट्रिक टन साखरेचा बफर स्टॉक केला आहे, मात्र यामध्ये महाराष्ट्रातील केवळ सात लाख मेट्रिक टन साखर गेली आहे. त्यामुळे सरकारच्या बफर स्टॉकचा राज्यातील कारखान्यांना फारसा फायदा झालेला नाही. त्यामुळे अतिरिक्त साखरेचा गंभीर प्रश्न बनला आहे.