सायकलिंग एशिया कपमध्ये नो डोप टेस्ट, खर्चिक बाबीमुळे फेडरेशनचा नाइलाज

349

सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने दिल्ली येथे 9 ते 11 सप्टेंबरदरम्यान ट्रक एशिया कप स्पर्धा पार पडली. ही ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा असून या स्पर्धेत खेळाडूंची डोप टेस्ट झाली नाही. नॅशनल ऍण्टी डोपिंग एजन्सीने (नाडा) डोप टेस्टसाठीच्या एका नमुन्यासाठी 30 हजार रुपये मागितले. या स्पर्धेला शासकीय मान्यता नसल्याने फेडरेशनला सर्व पैसे द्यावे लागणार होते. एवढे पैसे देणे शक्य नसल्याने फेडरेशनने डोप टेस्टशिवाय ही स्पर्धा घेतली.

‘वाडा’ने ‘नाडा’ला सहा महिन्यांसाठी निलंबित केले आहे. त्यामुळे डोपिंग टेस्टचे नमुने परदेशात पाठवावे लागत असल्याने साहजिकच खर्चातही वाढ झाली आहे. आधी एका डोप टेस्टसाठी फेडरेशनला 10 हजार रुपये खर्च यायचा. हा खर्च आता 30 हजार रुपयांपर्यंत वाढला आहे. ट्रक एशिया कप स्पर्धेत 16 देशांतील 146 सायकलपटू सहभागी झाले हेते. या स्पर्धेत आम्ही आर्थिक कारणामुळे खेळाडूंची डोप टेस्ट करू शकलो नाही, असे सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाने इंटरनॅशनल फेडरेशनला कळविले आहे. स्पर्धेसाठी डोपिंग टेस्ट अनिवार्य नसल्याचा खुलासा इंटरनॅशनल फेडरेशनकडून करण्यात आल्याने सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाला दिलासा मिळाला आहे, मात्र स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंपैकी कोणी पुढे डोपिंगमध्ये दोषी आढळल्यास त्याची या स्पर्धेतील कामगिरीही अमान्य होईल, असेही इंटरनॅशनल फेडरेशनने कळविले आहे.

‘स्पर्धा आयोजनाचे हे आमचे पाचवे सत्र होय. मागील चारही स्पर्धेत आम्ही डोप टेस्ट घेतल्या होत्या, मात्र यावेळी टेस्टचा वाढलेला खर्च पेलवणारा नव्हता. डोप टेस्टचा खर्च कमी करावा, अशी विनंती आम्ही ‘नाडा’कडे केली होती.’

ओंकार सिंग (चेअरमन, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया)

आपली प्रतिक्रिया द्या