ईद साजरी करण्याऐवजी गरजूंना मदत करणार, देवबंदच्या मुस्लीम व्यापाऱ्यांचा निर्णय

804

रमजानच्या पवित्र महिन्यानंतर सोमवारी सगळ्या देशात रमजान ईद साजरी होत आहे. पण, कोरोनाच्या सावटामुळे इतर सणवारांप्रमाणे ईदही साधेपणाने आणि घरात राहूनच साजरी करण्याचा निर्णय तमाम मुस्लिमांनी घेतला आहे. उत्तर प्रदेशातील देवबंद येथेही फळ व्यापाऱ्यांनी ईद साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, देवबंद येथील फळ व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुलेमान फारुकी यांनी या निर्णयाची माहिती दिली आहे. फारूकी म्हणाले की, कोरोना विषाणूच्या महामारीमुळे देशच नव्हे तर सगळं जग संकटात आहे. त्यामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सगळा व्यापार ठप्प आहे. ज्याचा सर्वाधिक फटका गरीब आणि मजुरांना बसला आहे. त्यामुळे यंदा आम्ही ईद साजरी न करण्याचा निर्णय घेतल्याचं फारूकी यांचं म्हणणं आहे.

रमजानच्या महिन्यात आम्ही गोरगरीबांना मदत केली. कारागृहातही अन्नदान केलं. काही कैद्यांकडे कपडे, चपला नव्हत्या, त्यांना ते देण्यात आलं, अशी माहिती देताना फारुकी यांनी मुस्लिमांना यंदा ईदवर खर्च करण्याऐवजी गरजूंना मदत करण्याचं आवाहन केलं आहे. प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करा, घरी राहून नमाज अदा करा, गर्दी करू नका असं आवाहनही फारुकी यांनी केलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या