पुलवामा हल्ल्यात गुप्तचरयंत्रणेची चूक नाही, केंद्र सरकारचे स्पष्टीकरण

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

जम्मू कश्मीरच्या पुलावामा हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. या प्रकरणी गुप्तचरयंत्रणेची कुठलीच चूक नव्हती असे स्पष्टीकरण केंद्र सरकारने दिले आहे. गृहमंत्रालयाने राज्यसभेत लिखित स्वरुपात हे स्पष्टीकरण दिले आहे. खासदार सय्यद नासिर यांनी प्रश्न विचारला होता की, पुलवामा हल्ल्याची पूर्वसूचना देण्यात गुप्तचरयंत्रणा अपयशी ठरले का? यावर उत्तर देताना गृह राज्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.

सय्यद नासिर यांनी पुढे प्रश्न विचारला की, जर तपासयंत्रणेची कुठलीच चूक नव्हती तर दहशतवद्यांनी 300 किलो स्फोटकांनी हल्ला केला केला? यावर राज्यमंत्री रेड्डी यांनी उत्तर दिले की, “गेल्या 30 वर्षांपासून जम्मू कश्मीर दहशतवादाने प्रभावित राहिले आहे. केंद्र सरकारने जम्मू कश्मीरमधील दहशवादाविरोधात झीरो टॉलरन्स धोरण अवलंबली आहे.”

तसेच सुरक्षा दलांकडून दहशतवादाविरोधात व्यापक स्तरावरून कारवाई सुरू असल्याचेही त्यांनी म्हटले. रेड्डी म्हणाले की, “या कारवाईत मोठ्या प्रमाणात दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. सर्व सरकारी यंत्रणा संयुक्तरित्या कार्यकरत आहेत. तसेच तपासयंत्रणाकडे जी माहिती येते त्याची पुष्टी इतर संस्थांकडून केली जाते.” पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाईंड, हल्लेखोर आणि वाहन उपलब्ध करणार्याहची ओळख एनआयने पटवल्याचीही माहिती त्यांनी दिली.