आंदोलनकर्त्यांनी ना तिरंगा हटवला, ना खलिस्तानी झेंडा फडकावला

गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला प्रजासत्ताक दिनी हिंसक वळण लागले. यावेळी काही आंदोलनकर्त्यांनी लाल किल्ल्यावर जाऊन एक झेंडाही फडकावला. यानंतर या झेंड्यावरून अनेक उलट सुलट चर्चा सुरू झाली.

परंतु हा झेंडा खलिस्तानी समर्थकांचा नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच हा झेंडा शीख धर्मियांचा धार्मिक झेंडा असून त्याला निशाण साहिब असे म्हणतात. त्यात दुधारी तलवार असून खलिस्तानी झेंड्यावर खलिस्तान असे स्पष्ट शब्दात लिहिले असते. इंडिया टुडेने याबाबत वृत्त दिले आहे.

आंदोलकांनी तिरंगा हटवला?

बहुतांश नेटकर्‍यांनी एएनआय वृत्तसंस्थेचा व्हिडीओ शेअर करून दावे केले आहेत. या व्हिडीओमध्ये एक आंदोलक एका पोलवर चढून झेंडा फडकावताना दिसत आहे. या पोलवर कुठलाही झेंडा नव्हता. आंदोलकानी या पोलवरील कुठलाही झेंडा काढलेला नव्हता. लाल किल्ल्यावर सर्वात उंचीवर तिरंगा फडकताना दिसत आहे. या झेंड्याशी कुठल्याही आंदोलनकर्त्यानी छेडछाड केल्याचे दिसत नाही. घटनास्थळी उपस्थित असलेल्या इंडिया टुडेच्या पत्रकाराने या घटनेला दुजोरा दिला आहे.

हा खलिस्तानी झेंडा होता का ?

एएनआयच्या व्हिडीओमध्ये झेंड्यावर झूम करून पाहिल्यास झेंडा पिवळ्या रंगांचा असून त्यावर तलवारीचे चिन्ह आहे. हे चिन्ह गुरू गोविंद सिंह यांच्या काळात वापरले जायचे. असे असले तरी हा धार्मिक झेंडा आहे आहे आणि धार्मिक नेत्यांनी अशा प्रकारे झेंडा फडकावल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

हा झेंडा खलिस्तानींचा नसून निशाण ए साहिब असल्याचे दिल्ली शीख गुरुद्वार प्रंबंधक समितीचे सदस्य हरिंदर पाल यांनी सांगितले. तसेच या घटनेचे आपण समर्थन करत नसल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रजासत्ताक दिनी झालेल्या आंदोलनात अनेक प्रकारचे झेंडे होते. त्यावरून सोशल मीडियावर गदारोळ सुरू आहे. परंतु लाल किल्ल्यावर खलिस्तानी झेंडा फडकवण्यात आला नव्हता हे सिद्ध झाले आहे. हा झेंडा शीख धर्मियांचा असून समाज बांधवांनी या घटनेचा निषेधही केला आहे. तसेच लाल किल्ल्यावरील तिरंगा हटवण्यात आला नाही, त्याच्याशी कुठल्याही प्रकारची छेडछाडही झाली नाही.

आपली प्रतिक्रिया द्या