मराठा आरक्षणाशिवाय अकरावी प्रवेश, एसईबीसी प्रवर्गातून अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेशाची संधी

सर्वोच्च न्यायालयाने सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षणाला (एसईबीसी, मराठा आरक्षण) स्थगिती दिल्यामुळे रखडलेल्या अकरावी ऑनलाइन प्रवेशावर अखेर तोडगा निघाला आहे. एसईबीसी प्रवर्गातून अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करणाऱया विद्यार्थ्यांना यापुढील गुणवत्ता यादीमध्ये खुल्या प्रवर्गातून प्रवेशाची संधी दिली जाणार आहे. आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागल्याने आज 26 नोव्हेंबरपासून ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार असून 5 डिसेंबरला दुसरी गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे.

राज्यात अकरावी ऑनलाइन प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर लगेचच सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली. प्रथम सत्र संपले तरी अकरावी प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली नव्हती. अखेर याप्रश्नी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने राज्य सरकारला आज बुधवारपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार राज्य सरकारने मराठा आरक्षणाविषयी शासननिर्णय जारी करून अकरावी प्रवेशाचा प्रश्न मार्गी लावला आहे. हा निर्णय राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात अंतरिम स्थगिती उठविण्याकरिता दाखल केलेल्या विशेष अनुज्ञा याचिकेच्या निर्णयाच्या अधीन राहून घेतला आहे, असे शासन अध्यादेशात म्हटले आहे.

असे होतील प्रवेश
– 9 सप्टेंबरनंतरील सर्व शैक्षणिक संस्थांमधील प्रवेश हे मराठा आरक्षण न देता पार पडतील.
– 9 सप्टेंबरपूर्वी मराठा आरक्षणानुसार प्रवेश अर्ज केलेल्या पण अद्याप प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश घ्यावा लागेल.
– 9 सप्टेंबरपर्यंत ज्या विद्यार्थ्यांना मराठा आरक्षणातून प्रवेश मिळाला आहे त्या विद्यार्थ्यांचे प्रवेश कायम राहणार आहेत.

मराठा आरक्षणाची राज्याची स्थिती
40,121
एकूण जागा
4,199
पहिली फेरी
8,057
अर्ज केलेले विद्यार्थी
35,922
रिक्त जागा

आपली प्रतिक्रिया द्या