न शिजवता खाऊ शकता हा तांदूळ

सामना ऑनलाईन । मुंबई

भात करायचा म्हटलं की तांदळू पहिले स्वच्छ धुवावा लागतो पंधरा ते वीस मिनिटे शिजवत ठेवावा लागतो. मात्र हिंदुस्थानात एक अशा प्रकारचा तांदूळ देखील पिकतो जो न शिजवताही खाता येतो. ईशान्येकडील आसाममध्ये हा तांदूळ पिकत असून ‘बोका चाऊल’ असे या तांदळाचे नाव आहे. हा तांदूळ फक्त पाण्यात भिजवला तरी खाण्याजोगा बनतो. या तांदळाला आता जीआय (जिऑग्रॉफिकल इंडिकेशन) चा टॅग मिळाला आहे. त्यामुळे आता या तांदळावर आसामचा कायदेशीर अधिकार असणार आहे.

‘बोका चाऊल’ हा तांदूळ आसाममधील नलबारी, बारपेटा, गोलपाडा, बक्सा, कामरुप, धुबरी, कोकराझर, दररंग या जिल्ह्यात पिकवला जातो. आसामी भाषेत त्याला ‘ओरिजा सातिवा’ असे म्हटले जाते. या प्रकारच्या तांदळाचा शोध सतराव्या शतकात लागला होता असे बोलले जाते. १७ व्या शतकात मुघलांसोबत लढताना आसाममधील सैनिक याच तांदळाचा भात तयार करायचे. आसाममध्ये ‘बोका चाऊल’ तांदळापासून तयार केलेला भात हा दही, दूध, ताक, साखर, गुळ अशा पदार्थांसोबत खाल्ला जातो.