
कमी रक्तदाबाचा त्रास असलेली व्यक्ती तो कमी करण्यासाठी स्वतःहून प्रवास करणे शक्य नसते, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने एका भाडेकरूला चांगलीच चपराक लगावली.
लोणावळ्यातील एका बंगल्यातील हा भाडेकरू आहे. तो मूळचा मुंबईचा आहे. मात्र या जागेत भाडेकरू राहत नाही. कधी तरी तेथे वास्तव्य करण्यास येतो. तेव्हा त्याला ही जागा रिकामी करण्याचे आदेश न्यायालयाने द्यावेत, अशी मागणी मालकाने केली. ती अपील न्यायालयाने मान्य केली. त्याविरोधात या भाडेकरूने याचिका दाखल केली. न्या. मिलिंद साठे यांच्या एकल पीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. भाडेकरूने आरामासाठी मुंबईहून लोणावळ्याला जात असल्याचा दावा केला. मात्र यामध्ये काहीही तथ्य नाही, असे नमूद करत न्यायालयाने भाडेकरूला ही जागा रिकामी करण्यासाठी सहा आठवडय़ांची मुदत दिली.
मुंबईची हवा मानवत नाही
मुंबईची हवा आरोग्याला मानवत नाही. त्यामुळे मी आरामाला या बंगल्यात येते. त्यामुळे जागा रिकामी करण्याचे अपील न्यायालयाचे आदेश रद्द करावेत, अशी मागणी भाडेकरूने केली होती.
22 वर्षांनी न्याय मिळाला
भाडेकरू येथे राहत नाही. तेव्हा ही जागा रिकामी करण्याचे आदेश भाडेकरूला द्यावेत, अशी मागणी अपील न्यायालयात केली. अपील न्यायालयाने 2002मध्ये भाडेकरूला जागा रिकामी करण्याचे आदेश दिले. त्याविरोधात त्याने 2003मध्ये याचिका केली. याची दखल घेत उच्च न्यायालयाने जागा रिकामी करण्याच्या आदेशाला अंतरिम स्थगिती दिली होती. यावर 22 वर्षांनी न्यायालयाने निकाल दिला.























































