परभणीतून पहिल्या दिवशी एसटी बसेस रिकाम्या; प्रवाशांचा अल्प प्रतिसाद

478

एसटी महामंडळाने शुक्रवारपासून जिल्ह्यांतर्गत बससेवेला परवानगी दिली आहे. मात्र, नागरिकांमध्ये कोरोनाची भीती असल्याने अद्याप बससेवेला प्रवासी मिळत नाहीत. शुक्रवारी पहिल्या दिवशी एसटीसेवेला अल्प प्रतिसाद मिळाला. शहरातील एसटी स्टँडहून रिकाम्या गाड्या जात असून परतीच्या प्रवासातही हीच परिस्थिती आहे.

कोरोना रोखण्यासाठी 22 मार्चपासून देशभरात लॉकडाऊन आहे. त्यामुळे एसटी सेवाही बंद करण्यात आली होती. मात्र, आता जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे. परभणी विभागाअंतर्गत येणाऱ्या परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील सात आगारांमधून धावणाऱ्या बसेसचे तात्पुरत्या स्वरुपाचे नियोजन महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. यामध्ये परभणी आगारातून रोज परभणी-सेलू मार्गावर 16 फेऱ्या होत आहेत. तर परभणी-पालम 18, परभणी-लोहरा 12 फेऱ्या, परभणी-कुंभारी 12 अशा एकूण 70 फेऱ्या होणार आहेत. या बसेस एकूण 2 हजार 288 किमी धावणार आहेत. या प्रमाणेच जिंतूर आगारातून जिंतूर-परभणीच्या ये-जा करणाऱ्या 20 फेऱ्या तर जिंतूर-सेलू मार्गावर 16 अशा एकूण 36 फेऱ्यातून बस 1 हजार 616 किमी धावणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या