
उदय जोशी, बीड
मुख्यमंत्र्याच्या हस्ते विकास कामाचा शुभारंभ करत राष्ट्रवादी वर दबावतंत्राचा वापर करणाऱ्या जयदत्त क्षीरसांगराच्या विरोधात एकीकडे मवाळ भूमिका घेणाऱ्या राष्ट्रवादी ने परळीत होणाऱ्या निर्धार परिवर्तनच्या जाहीर कार्यक्रमात जयदत्त क्षीरसागराना स्थान दिले नाही राष्ट्रवादीच्या बॅनर आणि कटाऊट मधून क्षीरसागराचा फोटो गायब केला आहे.
वरिष्ठ पातळीवर सन्मान देणारी राष्ट्रवादी जिल्हापातळीवर मात्र जयदत्त क्षीरसागराना सार्वजनिक आणि पक्षाच्या कार्यक्रमापासून दूर ठेवत आहे. गेल्या दोन वर्षांपासून क्षीरसागर आणि राष्ट्रवादी यांच्यात शीतयुद्ध सुरू आहे. एकिकडे राष्ट्रवादीमध्ये राहून जयदत्त क्षीरसागर भाजपाच्या जवळ जात आहेत. भाजपाच्या नेत्यांशी सलगी वाढवत आहेत. कोणतेही निमित्तसाधून भाजपा नेत्यांशी उठबस वाढवत आहेत. काही दिवसांपूर्वीच बीड शहरातीलतब्बल चारशे कोटी रुपयांच्या विकास कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते दिमाखात पार पाडत राष्ट्रवादी वर दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला होता.
या कार्यक्रमानंतर ही राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी जयदत्त क्षीरसागर आमचे एक नेते आहेत. विकास कामात राजकारण नसते, म्हणत क्षीरसागराच्या बाबतीत सावध भूमिका घेतली होती. एकिकडे राष्ट्रवादीच्या वरिष्ठ पातळीवर जयदत्त क्षीरसागराचा सन्मान राखला जातो. तर दुसरीकडे जिल्हापातळीवर राष्ट्रवादी त्यांना बेदखल करत आहे, अनेक कार्यक्रमात त्यांना बाजूला ठेवले गेले होते. जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते जयदत्त क्षीरसागरांना दूर ठेवत असतील तर त्यांना पक्षांकडूनच सांगितले जात असेल, असे बोलले जात आहे.
आगामी 23 फेब्रुवारी रोजी परळीमध्ये राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाची जंगी तयारी सुरू आहे, ठिकठिकाणी राष्ट्रवादीचे बॅनर लागले आहेत. या बॅनरवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांच्यासह प्रत्येक मतदार संघाचे नेत्यांना स्थान दिले गेले. यात माजी मंत्री प्रकाश सोळुंके, अमरसिंह पंडित, बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागर, अक्षय मुंदडा, बाळासाहेब अजबे, पृथ्वीराज साठे तसेच आयोजकांमध्ये विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे याचे फोटो आहेत. पण, यात फक्त जयदत्त क्षीरसागर फोटो नाही. म्हणून राष्ट्रवादी जयदत्त क्षीरसागरांना झुलवत आहे की जयदत्त क्षीरसागर राष्ट्रवादीला असा सवाल उपस्थित होत आहे.























































