काँग्रेस अध्यक्षपदापासून महाराष्ट्र 107 वर्षे वंचित!

88

>> तानाजी कोलते

1885 ते 1912 दरम्यानचे आठ महाराष्ट्रीय नेते वगळता त्यानंतर अध्यक्षपदासाठी लोकमान्य टिळक, शंकरराव देव आणि शरद पवार यांना अध्यक्षपदापासून काँग्रेसने वंचित ठेवलेला इतिहास आहे. टिळकांचा अस्त आणि गांधी युगाच्या प्रारंभानंतर नेहरू घराण्याकडे काँग्रेसची सूत्रे गेली ती आजपर्यंत कायम राहिली. आता नव्या काँग्रेस अध्यक्षाच्या नियुक्ती किंवा निवडणुकीत महाराष्ट्राला 107 वर्षांनंतर काँग्रेस अध्यक्षपद मिळण्याची आशा वाढीस लागली आहे.

काँग्रेस आणि भाजप या दोन्ही मोठय़ा राष्ट्रीय पक्षांनी महाराष्ट्राला राष्ट्रीय अध्यक्षपदापासून दीर्घकाळ वंचित ठेवले. 1912 साली बांकीपूर बिहार येथील काँग्रेसचे अध्यक्षपद विदर्भातील अकोल्याचे प्रख्यात कायदेपंडीत बॅ. रंगनाथ मुधोळकर यांनी भूषविले होते. त्यानंतर आजतागायत 107 वर्षे महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्षपदापासून वंचित राहिला. भाजपने (पूर्वाश्रमीचा जनसंघ) 60 वर्षांनंतर नितीन गडकरी यांना अध्यक्षपद दिले आणि दोन वर्षांनी काढूनही घेतले. इतर राष्ट्रीय संघटना आणि त्यांचे नेते महाराष्ट्रीय होते. त्या पक्षांना महाराष्ट्राने फारसे काही दिले नाही. हे दोघेही अध्यक्षीय नेते विदर्भाचे हे वैशिष्टय़!
महाराष्ट्रातील सुशीलकुमार शिंदे आणि कर्नाटकचे मल्लिकार्जुन खरगे (कन्नडी कम मराठी) या नेत्यांची काँग्रेस अध्यक्षपदासाठी नावे आली आणि थांबली. 1885 ते 1912 दरम्यानचे आठ महाराष्ट्रीय नेते वगळता त्यानंतर अध्यक्षपदासाठी लोकमान्य टिळक, शंकरराव देव आणि शरद पवार यांना अध्यक्षपदापासून काँग्रेसने वंचित ठेवलेला इतिहास आहे. त्यानिमित्ताने काँग्रेसची वंचित 107 वर्षे आणि भाजपने 60 वर्षांनंतर महाराष्ट्राला दिलेले अध्यक्षपद यांची तुलना क्रमप्राप्त ठरते.

स्वातंत्र्यपूर्व काळात 1907 मध्ये नागपूरला भरणारी काँग्रेस सुरतेला गेली आणि 1918 दिल्लीतील काँग्रेसचे अध्यक्षपद टिळकांना मिळणार असताना टिळक लंडनला चिरोलीविरोधी खटल्यासाठी गेल्याने त्यांचे अध्यक्षपद दोनदा आणि कायमचे हुकले. 1950 मध्ये नाशिक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक देशभक्त शंकरराव देव तिसऱया क्रमांकावर येऊन हरले. 1997 मध्ये सीताराम केसरींविरोधात शरद पवार हरले. पवार दुसऱया आणि राजेश पायलट तिसऱया क्रमांकावर होते.

काँग्रेसचे 1885 मधील पहिले अधिवेशन पुण्यात प्लेगची साथ असल्याने मुंबईला गेले आणि कोलकात्याचे उमेशचंद्र बॅनर्जी अध्यक्ष झाले. त्यानंतर कोलकाता, लाहोर आणि कोलकाता येथील अनुक्रमे 1886, 93 आणि 1906 मध्ये तीनदा अध्यक्षपद भूषविणारे दादाभाई नौरोजी हे एकमेव महाराष्ट्रीयन ठरले. 1900 मध्ये मुंबईचे नारायणराव चंदावरकर यांनी लाहोर आणि 1905 मध्ये नामदार गोपाळकृष्ण गोरवले यांनी बनरस काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविले. मुंबईचे बद्रुद्दीन तय्यबाजी (1887 मद्रास) बॅ. फिरोजशहा मेहता (1890 कोलकाता, 1907 सुरत), रहिमतुल्ला सयानी (1896 कोलकाता), दिनशा एहलजी वाच्छा (1901) कोलकाता आणि 1912 मध्ये रंगनाथ मुधोळकर आदी आठ महाराष्ट्रीयन 11 वेळा काँग्रेसचे अध्यक्ष झाले. नौरोजी, मेहता, वाच्छा हे तीन पारशी, तय्यबजी आणि सयानी मुस्लिम आणि चंदावरकर, गोखले आणि मुधोळकर हे तीन मराठी हिंदू होते.

काँग्रेसच्या प्रारंभीच्या पाव शतकात चार विदेशी पुरुषांनी पाचवेळा अध्यक्षपद भूषविले. जॉर्ज वूल हे स्कॉरिश गृहस्थ (1988 अलाहाबाद), काँग्रेसचे संस्थापक सर ऍलन ह्यूमन यांचे एक सहकारी विल्यम वेडनबर्ग (1889 मुंबई, 1910 अलाहाबाद, अफ्रेड वेब (1894 मद्रास) आणि सर हेन्री कॉटन (1904 मुंबई), ऍनी बेझंट (1917 कोलकाता) या स्कॉटिश महिला काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत. त्यानंतर सरोजिनी नायडू (1925 कानपूर), नेल्सी सेनगुप्ता (1933 कोलकाता), स्वातंत्र्यानंतर 1960 आणि 1978 ते 1984 मध्ये इंदिरा गांधी तसेच 1998 नंतर 20 वर्षे सोनिया गांधी अशा पाच महिलांनी काँग्रेस अध्यक्षपद भूषविले. त्यात ऍनी बेझंट, नेल्सी सेन गुप्ता आणि सोनिया गांधी या तीन विदेशी वंशाच्या महिला आणि चार पुरुष मिळून सात विदेशी वंशाचे काँग्रेसचे अध्यक्ष होते. नेहरू-गांधी कुटुंबातील सहा व्यक्तींनी काँग्रेस अध्यक्षपद प्रदीर्घकाळ भूषविले आहे.

स्वातंत्र्यानंतर देशात काँग्रेस, जनसंघ, कम्युनिस्ट, मार्क्सवादी, समाजवादी, प्रजा समाजवादी, संयुक्त समाजवादी, स्वतंत्र पार्टी, संघटना काँग्रेस आदी राष्ट्रीय पक्ष 1977 पर्यंत अस्तित्व राखून होते. ना. ग. गोरे पीएसपीचे आणि एसेम जाशी एसएसपीचे तर मुंबईचे अशोक मेहता आधी एसएसपीचे आणि नंतर संघटना काँग्रेसचे अध्यक्ष होते. कम्युनिस्ट पार्टीचे प्रमुखपद कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांनी अनेकदा आणि पुढे नागपूरचे ए. बी. वर्धन या मराठी नेत्यांनी भूषविलेले आहे. देशभक्त शंकरराव देव यांच्यानंतर काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अयशस्वी झालेले शरद पवार यांनी गेली 20 वर्षे स्वतःच्या राष्ट्रवादी काँग्रेऩस या राष्ट्रीय मान्यताप्राप्त पक्षाचे अध्यक्षपद सांभाळलेले आहे.

भारतीय जनसंघ हा राजकीय पक्ष संघाचीच एक राजकीय शाखा होती. जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी होते. त्यानंतर डॉ. रघुवीर, दीनदयाळ उपाध्यक्ष, बलराज मुधोक आणि अटलबिहारी वाजपेयी असे 1977 पर्यंत पाच अध्यक्ष झाले. 1980 मध्ये भाजपची स्थापना झाल्यानंतर अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी, दीर्घकाळ अध्यक्ष राहिले. प्रा. मुरलीमनोहर जोशी (उत्तर प्रदेश), कुशाभाऊ ठाकरे (मध्य प्रदेश), बंगारू लक्ष्मण आणि जेना कृष्णमूर्ती (तामीळनाडू), व्यंकय्या नायडू (आंध्र प्रदेश), नितीन गडकरी (महाराष्ट्र), राजनाथसिंग (उत्तर प्रदेश), अमित शहा (गुजरात) असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले. काँग्रेसने 1912 पासून आतापर्यंत 107 वर्षांत आणि भाजपने 2010 पर्यंत 60 वर्षांत महाराष्ट्राला अध्यक्षपदापासून वंचित ठेवले हे दोन्ही मोठय़ा राज्कीय पक्षातील महाराष्ट्राबाबतचे साम्य आहे.

काँग्रेसची स्थापना 1885 मध्ये झाल्यापासून पहिले जागतिक महायुद्ध संपेपर्यंत आणि त्यानंतरही काही काळ काँग्रेसही एक चळवळ होती. मुस्लिम लीग, कम्युनिस्ट, हिंदुत्ववादी, समाजवादी, शेकाप आदी डझनभर पक्ष काँग्रेसमध्ये कार्यरत होते. मोतीलाल नेहरू यांचा स्वराज्य पार्टी पक्ष होता. टिळक जहाल गटाचे म्हणून त्यांना काँगेसचे अध्यक्षपद मिळू दिले नाही. कारण संपूर्ण स्वराज्य मागणारे टिळक अग्रणी होते. म्हणूनच काँगेसच्या स्थापनेनंतर 45 वर्षांनी 1929 मध्ये लाहोर काँगेसमध्ये जवाहरलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण स्वराज्याचा पहिला ठराव मांडण्यात आला होता. महात्मा गांधी 1924 मध्ये बेळगाव काँग्रेसचे अध्यक्ष होते, पण तोपर्यंतही संपूर्ण स्वराज्य काँग्रेसने मागितलेले नव्हते.

टिळकांचा अस्त आणि गांधी युगाच्या प्रारंभानंतर नेहरू घराण्याकडे काँग्रेसची सूत्रे गेली ती आजपर्यंत कायम राहिली. राहुल गांधी यांनी गांधी कुटुंबाचा अध्यक्ष नकोच अशी भूमिका घेऊन पदभार सोडला आणि नव्या काँग्रेस अध्यक्षाच्या नियुक्ती किंवा निवडणुकीत महाराष्ट्राला 107 वर्षांनंतर काँग्रेस अध्यक्षपद मिळण्याची आशा वाढीस लागली आहे. 1912 मध्ये वैदर्भीय बॅ. मुधोळकर यांना संधी मिळाली होती. आता 107 वर्षांनी महाराष्ट्रातील कोणाला मिळणार का, हे भविष्यातच कळेल.

(लेखक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक आहेत.)

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या