महाविकास आघाडीत कोणतीही कुरबूर किंवा अस्वस्थता नाही-  शरद पवार

राज्यावर कोरोनाचे संकट आल्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे चांगले काम करत आहेत. ते सलग चौदा-पंधरा तास काम करतात, बैठका घेतात, असे सांगतानाच महाविकास आघाडीत सर्वकाही आलबेल असून, कोणतीही कुरबूर किंवा अस्वस्थता नाही. त्यामुळे विरोधकांनी अशा संकटकाळात टीकाटिपण्णी करू नये, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधकांना सुनावले. दरम्यान, ‘मातोश्री’वर जाण्यात मला अजिबात कमीपणा वाटत नाही, असेही त्यांनी निक्षून सांगितले.

पुणे व्यापारी महासंघाच्या पदाधिकार्‍यांसोबतच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी  विविध प्रश्नांना उत्तरे दिली.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्या मातोश्री भेटीवर भाष्य केले होते. त्यावर बोलताना पवार म्हणाले, पाटील काय भाष्य करतात यावर मी बोलणार नाही. शिवसेना नेते, दैनिक ‘सामना’चे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत माझी मुलाखत घेणार होते. मुलाखत देण्यासाठी मी ज्या भागात गेलो होतो तेथून फर्लांगभर अंतरावर ‘मातोश्री’ आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी 14 किलोमीटर अंतरावर माझ्या घरी येण्यापेक्षा मीच त्यांच्याकडे गेलो. मातोश्री येथे जाण्यात मला आजिबात कमीपणा वाटत नाही, अशा शब्दांत शरद पवार यांनी भाजपला सुनावले.

व्यापार-उद्योगांना सावरण्यासाठी सहा महिने ते एक वर्ष लागेल

व्यापार्‍यांच्या प्रश्नांवर बोलताना पवार म्हणाले, लॉकडाऊनचा सगळ्याच व्यवसायांवर परिणाम झाला आहे. मार्केटचे विकेंद्रीकरण करायचे आहे, असे पुण्यातील व्यापार्‍यांच्या मनात आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यातली बाजारपेठ बंद केली आहे. राज्य सरकारने काही दुकाने आणि व्यवसाय सुरू करण्याची संमती दिली आहे. तरीही ग्राहकांच्या मनात भीती आहे. त्यामुळे हवा तसा प्रतिसाद दिसत नाही. कोरोनाचे संकट मानवी समाजाला अस्वस्थ करणारे आणि चिंताजनक असं संकट आहे. सरकारने जी बंधनं घालून देईल ती बंधनं घालून घेत व्यापार करण्याची आमची तयारी आहे असंही व्यापारी महासंघाने सांगितल्याचे पवार यांनी सांगितले. सध्या जो फटका व्यापार आणि उद्योगांना बसला आहे. त्यातून सावरण्यासाठी सहा महिने ते वर्षभराचा कालावधी लागू शकतो. त्यांना केंद्र आणि राज्य सरकारने मदत करावी असे आवाहनही शरद पवार यांनी केले.

महाआघाडीत एकवाक्यता

महाविकास आघाडीत अस्वस्थता आहे, हे सगळं माध्यमांच म्हणणं आहे. तुमच्यामुळे माझ्या ज्ञानात भर पडली त्यासाठी धन्यवाद, असा चिमटा पवार यांनी माध्यमांना काढला. राज्यात विविध प्रश्न आहेत. त्याबाबत मी सातत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलत असतो. मुख्यमंत्र्यांच्या कामावर आपण समाधानी आहोत. मुख्यमंत्र्यांनी सत्ता हातात घेतल्यानंतर गतीने पावले टाकण्यासाठी अनेक योजना आखल्या. कोरोनामुळे या योजनांचा प्राधान्यक्रम बदलला. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी सरकार युद्धपातळीवर काम करत आहे. मुख्यमंत्री 14 ते 15 तास काम करत आहेत. हे मी जवळून पाहतो आहे. महाविकास आघाडीत एकवाक्यता असून, कोणतीही अस्वस्थता किंवा कुरबूर नाही. आमच्यात सर्व अलबेल आहे, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

कोरोना संकटात नेतृत्व करणार्‍या प्रमुख लोकांनी बाहेर पडणे योग्य नाही

कोरोना संकटात नेतृत्व करणार्‍या प्रमुख लोकांनी बाहेर पडणे योग्य नाही. ते बाहेर पडल्यास गर्दी होते आणि तेच नेमके टाळण्याची आता गरज आहे. कोरोनाचा गर्दी टाळणे हाच मुख्य नियम आहे, असे पवार यांनी स्पष्टपणे सांगितले. काम करण्यासाठी बाहेर पडलेच पाहिजे, असे काही नाही. सध्या कम्युनिकेशनची अनेक  साधने आहेत. त्याचा वापर केला जात आहे. त्यामुळे उगाच नेतृत्वावर टीका करणे योग्य नाही, असे पवार यांनी विरोधकांना फटकारले.

आपली प्रतिक्रिया द्या