सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्यासाठी शिफारशीची गरज नाही! केंद्राची भूमिका

236

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना देशातील सर्वोच्च असा ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्यासाठी कोणत्याही शिफारशीची गरज नाही, असे केंद्र सरकारने काल स्पष्ट केले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी अतुलनीय योगदान देणार्‍या सावरकर यांना ‘भारतरत्न’ देण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेने सुरुवातीपासून लावून धरली आहे.

सावरकरांना भारतरत्न कधी देणार, असा प्रश्न मुंबईतील भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी लोकसभेत उपस्थित केला होता. त्यावर सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी कोणत्याही औपचारिक शिफारशीची गरज नसून योग्य वेळी निर्णय घेतला जाईल, असे उत्तर केंद्रीय गृह मंत्रालयाने दिले. सावरकरांना भारतरत्न देण्याचे भाजपने निवडणूक घोषणापत्रातही म्हटले होते.

भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर हे क्रांतिकारकांसाठी एक आदर्श होते. सशस्त्र्ा क्रांतीच्या माध्यमातून त्यांनी ब्रिटिश राजवटीच्या नाकीनऊ आणले होते. सावरकरांकडून प्रेरणा घेऊन अनेक क्रांतिकारकांनी देशाच्या स्वातंत्र्यलढय़ात स्वतःला झोकून दिले होते. हिंदुत्ववादी विचारांच्या संघटना आणि राजकीय पक्ष सावरकरांना आदर्श मानतात.

पंतप्रधान इंदिरा गांधी यासुद्धा सावरकरांच्या समर्थक होत्या असे सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनी नुकतेच म्हटले होते. गांधीहत्येमध्ये सावरकरांचा सहभाग नव्हता हे सिद्ध झाले आहे आणि काँग्रेसही सावरकरांना विरोध नाही असे म्हणत आहे असे ते म्हणाले होते.

आपली प्रतिक्रिया द्या