स्मशानभूमीला छप्परच नाही, भरपावसात मृतदेहावर पत्रा धरून अंत्यसंस्कार, मुंबईच्या वेशीवर मरणयातना.. विकासाला भडाग्नी

मोदी सरकार एकीकडे देशाचा अमृतकाळ साजरा करत असताना आणि डिजिटल इंडियाचे नगारे वाजवत असताना मुंबईच्या वेशीवर असलेल्या गावांना मात्र मरणयातना सोसाव्या लागत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पनवेलजवळील आपटा येथील दाभोळवाडी गावात स्मशानभूमीवर पत्रेच नसल्याने गावातील महिलेच्या मृतदेहावर भरपावसात पत्रा धरून अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ गावकऱ्यांवर आली. यामुळे अंत्यसंस्कार करताना या महिलेच्या मृतदेहाची हेळसांड झाली. या घटनेनंतर सरकारच्या ‘विकासा’लाच भडाग्नी दिल्याचा संताप गावकऱ्यांनी व्यक्त केला.
दाभोळवाडी येथील गिरजी वाघे या महिलेचे निधन झाले. तिचा मृतदेह स्मशानात आणला. मात्र स्मशानभूमीवर पत्रेच नसल्याने अंत्यसंस्काराची तयारी उघड्यावरच केली. इतक्यात पाऊस सुरू झाला. त्यामुळे भडाग्नी दिलेल्या तिच्या मृतदेहावर पत्रे धरून अंत्यसंस्कार करावे लागले. यामुळे गिरजीबाईच्या मृतदेहाची हेळसांड झाली.

आदिवासी वाड्यांच्या विकासाकडे जाणुनबुजून दुर्लक्ष केले जात आहे. दाभोळवाडीबरोबरच आपटा, गंगेचीवाडी आणि कोरलवाडी येथील स्मशानभूमींची तीच दुरवस्था असल्याचा संताप गावकऱ्यांनी व्यक्त केला.