लातूर जिल्ह्यातील 5 मध्यम प्रकल्प कोरडे; मांजरा प्रकल्पात 19.124 दलघमी मृत साठा

401

लातूर जिल्ह्याला पाणीपुरवठा होणाऱ्या धनेगाव ता. केज येथील मांजरा प्रकल्पामध्ये उपयुक्त पाणीसाठा नाही. या प्रकल्पात सध्या 19.124 दलघमी मृतसाठा शिल्लक असून त्यातुन पाणीपुरवठा केला जात आहे. तर माकणी ता. लोहारा येथील निम्न तेरणा प्रकल्पात केवळ 5.042 दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील 8 मध्यम प्रकल्पांपैकी 5 मध्यम प्रकल्प कोरडे आहेत. 132 लघू प्रकल्पामध्ये केवळ 10.01 टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.

लातूर जिल्ह्यातील पाणी टंचाई सर्वांना माहिती आहे. लातूर शहरात सध्या महिन्यातून केवळ 3 वेळा पाणीपुरवठा केला जात आहे. लातूर जिल्ह्यात पाणीपुरवठा होणाऱ्या बीड जिल्ह्याचे मांजरा प्रकल्प धनेगाव येथे सध्या 19.124 दलघमी मृतसाठा शिल्लक आहे. यातुनच सध्या पाणीपुरवठा केला जात आहे. धाराशिव जिल्ह्यातील निम्न तेरणा प्रकल्प माकणी या ठिकाणी 5.042 दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. लातूर जिल्ह्यात 8 मध्यम प्रकल्प आहेत. तावरजा मध्यम प्रकल्प लातूर, व्हटी मध्यम प्रकल्प रेणापूर, साकोळ मध्यम प्रकल्प शिरुर अनंतपाळ, घरणी मध्यम प्रकल्प शिरुर अनंतपाळ, मसलगा मध्यम प्रकल्प ता. निलंगा हे पाच मध्यम प्रकल्प कोरडेच आहेत. तर रेणापूर मध्यम प्रकल्प येथे 14.72 टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. तिरू मध्यम प्रकल्प उदगीर येथे 17.20 टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. देवर्जन मध्यम प्रकल्प उदगीर येथे 1.80 दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. लातूर जिल्ह्यात 132 लघू पाटबंधारे प्रकल्प असून या सर्व प्रकल्पात मिळून केवळ 10.01 टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या