मंत्रालयात बिगरगुजराती अधिकारी बघून वाईट वाटते! गुजरातच्या उपमुख्यमंत्र्यांची खंत

1269

मंत्रालयात बिगरगुजराती अधिकारी बघून वाईट वाटते, अशी खंत गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी व्यक्त केली. ‘मी रोज मंत्रालयात जातो. त्यावेळी सचिवांची नेमप्लेट बघून खूप वाईट वाटते. कारण मंत्रालयात आयएएस, आयपीएससह अनेक मोठे अधिकारी हे बिगरगुजराती आहेत. गुजराती समाज हा शिकून, व्यापार धंद्यात अमेरिकेसह अनेक देशांमध्ये पोहोचला पण तो अजून गुजरातच्या मंत्रालयात पोहोचला नाही,’ असे पटेल म्हणाले.

गांधीनगरमध्ये चौधरी समाजाच्या स्नेहमिलन कार्यक्रमात ते बोलत होते. चौधरी समाजाला आवाहन करताना ते म्हणाले, समाजाने आपल्या मुलांना  शिकून-सवरून उच्च पदावरून काम करण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे. गुजराती समाजाला नोकरीत कमी रुची आहे. त्यामुळेच रेल्वे, बंदरे, ओएनजीसीसहित अनेक आस्थापनांमध्ये गुजराती समाज कमी आहे. मुले आयएएस-आयपीएस बनावेत म्हणून सरकार प्रशिक्षण संस्थांना सवलत देत आहेत. पालकांनीही मुलांना त्यासाठी प्रवृत्त करावे. असे झाले तरच उच्च पदांवर गुजराती समाज दिसेल.

गुजराती अधिकारीच लोकांच्या भावना, गरजा समजू शकतात!

गुजराती अधिकार्‍याला या मातीतील लोकांच्या भावना, गरजा आणि  तळागाळाची चांगली माहिती असते. राज्यातील बिगरगुजराती अधिकारीही चांगले काम करत आहेत पण ज्या आपलेपणाच्या भावनेने गुजराती काम करेल, त्यात हे अधिकारी कमी पडत आहेत. भावनेबरोबर गुजराती भाषा न येणे ही पण त्यांची एक समस्या आहे. ग्रामस्थ, शेतकरी अशा अधिकार्‍यांबरोबर सहज बोलू शकत नाहीत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

आपली प्रतिक्रिया द्या