ईशान्य मुंबईत महायुतीचा एकहाती विजय

1002
bjp-shivsena

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि मानखुर्द-शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात महायुतीच्याच उमेदवारांनी एकहाती विजय मिळवला. येथील विकासकामांमुळे या ठिकाणी महायुतीचेच उमेदवार एकहाती विजय खेचून आणतील, अशी अपेक्षा होती.

मुलुंडमध्ये मिहीर कोटेचा यांची बाजी
मुलुंड विधानसभेत महायुतीचे मिहीर कोटेचा पहिल्यांदाच रिंगणात उतरले होते. काँग्रेस आघाडीतर्फे राजेंद्र चव्हाण तर मनसेच्या हर्षदा चव्हाण अशी तिरंगी लढत झाली. वर्षानुवर्षे हा मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात राहिला आहे. यावेळीही मतदारांनी महायुतीलाच पसंती दिली.

भांडुपमध्ये विकासकामांचाच विजय
भांडुप विधानसभा मतदारसंघात आजी आणि माजी नगरेसवक यांच्यात लढत पाहायला मिळाली. या मतदारसंघातून शिवसेनेचे नगरसेवक, विभागप्रमुख रमेश कोरगावकर तर काँग्रेस महाआघाडीतर्फे माजी नगरसेवक सुरेश कोपरकर रिंगणात होते. या भागातील महायुतीच्या संघटनात्मक ताकदीमुळे कोरगावकर यांचा सहज विजय झाला.

घाटकोपरमध्ये महायुतीचाच बोलबाला
घाटकोपर पूर्वमध्ये महायुतीचे पराग शहा, काँग्रेस आघाडीच्या सूर्यवंशी यांच्यात प्रमुख लढत झाली. मतदारसंघात बहुसंख्येने असलेल्या गुजराती मतदारांचा कौल महायुतीलाच मिळाला. वर्षानुवर्षे हा मतदारसंघ भाजपाकडे असून माजी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी केलेली विकासकामे महायुतीच्याच पथ्यावर पडली.

विक्रोळीत शिवसेनेला जनादेश
विक्रोळी मतदारसंघातून महायुतीचे सुनील राऊत निवडणूक रिंगणात उतरले होते. त्यांनी मागील पाच वर्षांत मतदारसंघात विकासकामांचा डोंगर रचल्याने मतदारांनी पुन्हा एकदा त्यांच्यावरच विश्वास दाखवत विधानसभेत पाठवले. अपेक्षेनुसार शिवसेनेला जनादेश मिळाला. दरम्यान, सुनील राऊत यांचे कांजूरवासीयांनी जल्लोषात स्वागत केले. यावेळी म्युनिसिपल कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम, विजय तोडणकर, बाबू ठाकूर, तानाजी मोरे, शांतीलाल बोऱहाडे, सिद्धी जाधव, भारती शिंगाटे आदी उपस्थित होते.

घाटकोपर पश्चिममध्ये महायुतीच
घाटकोपर पश्चिममध्ये महायुतीचे राम कदम यांनी काँग्रेस आघाडीचे आनंद शुक्ला यांना पराभूत केले. या मतदारसंघातून ते तिसऱयांदा विधानसभेवर गेले आहेत. त्यांनी गेल्या 10 वर्षांत केलेली विकासकामे आणि महायुतीची संघटनात्मक ताकद मतदारांनी विचारात घेतली.

मानखुर्द-शिवाजीनगरमध्ये सपा
मानखुर्द-शिवाजीनगरमध्ये महायुतीचे विठ्ठल लोकरे यांचा अटीतटीच्या लढतीत निसटता पराभव झाला. येथून सपाचे अबू आझमी निवडून आले. विकासकामांच्या बाबतीत विद्यमान आमदार अबू आझमी यांच्याबाबत मतदारांमध्ये प्रचंड नाराजी होती.

शिवडीत पुन्हा शिवसेनाच
हा मतदारसंघ गेली अनेक वर्षे शिवसेनेच्या ताब्यात आहे. शिवसेनेचे उमेदवार बदलले पण विरोधकांना कधीच या ठिकाणी विजय मिळाला नाही. शिवसेना आमदार अजय चौधरी यांच्या विरोधात काँग्रेस आघाडीतर्फे उदय फणसेकर निवडणुकीच्या रिंगणात होते. या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना चौधरी यांनी जनतेला भेडसावणाऱया समस्यांना वाचा फोडण्याचे काम विधानसभेत केले. तसेच त्यांनी गेल्या पाच वर्षांत केलेली विकासकामे व शिवसेनेच्या संघटनात्मक ताकदीच्या जोरावर शिवडीत पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकला.

आपली प्रतिक्रिया द्या