गोव्यातील पर्यटन क्षेत्राला फटका बसला, जमावबंदीचे आदेश मागे घेतले

417

दहशतवादी हल्ला होण्याच्या भीतीने गोवा सरकारने उत्तर गोव्यात जमावबंदी लागू केली होती. ही जमावबंदी 60 दिवसांसाठी लागू करण्यात आली होती. गोव्यामध्ये कार्निव्हल जवळ आला असून हा पाहण्यासाठी अनेक पर्यटक गोव्यात येत असतात. अनेक पर्यटकांनी जमावबंदी लागू केल्याने गोव्यात येणं रद्द केलं होतं. याचा फटका पर्यटन क्षेत्राला बसला असून यामुळे उत्तर गोवा प्रशासनाने आपला निर्णय मागे घेतला आहे.

गोवा सरकारने घेतलेल्या जमावबंदीच्या निर्णयावर तिथल्या पर्यटन क्षेत्राशी निगडीत अनेकांनी टीका केली होती. या सगळ्यांनी 10 फेब्रुवारी रोजी जमावबंदीच्या आदेशावर नाराजी व्यक्त करताना याचा फटका पर्यटन क्षेत्राला बसणार असल्याची भीती व्यक्त केली होती. वाढत्या नाराजीमुळे अखेर उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी गोपाळ पार्सेकर यांनी जमावबंदीचे आदेश मागे घेत असल्याचे जाहीर केले.

जमावबंदीचे आदेश संभाव्य दहशतवादी हल्ल्याच्या धोक्यामुळे जारी करण्यात आले होते. या आदेशानंतर भाडेकरूंच्या कसून तपासणीचे आणि सायबर कॅफेमध्ये येणाऱ्यांची पूर्ण खातरजमा करण्याचे आदेश देण्यात आले होते. या जमावबंदीमुळे वाद निर्माण झाल्यानंतर तिथले मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी तो शांत करण्याचा त्यांच्या परीने प्रयत्न केला. गोव्याला कोणत्याही पद्धतीचा दहशतवादी हल्ल्याचा तूर्तास कोणताही धोका नाहीये. पर्यटकांनी घाबरण्याचे कारण नाहीये असं त्यांनी सांगितले. 22 तारखेपासून सुरू होणाऱ्या कार्निव्हलच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेले विधान महत्वाचे मानले जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या