‘नॉस्टेल्जियाना’च्या सुरावटींवर रसिक धुंद

‘नॉस्टेल्जियाना’चे तिसरे संगीत संमेलन नुकतेच लोणावळा येथील लगूना रिसोर्ट येथे रंगले. दोन दिवसीय संगीत संमेलनात अनेक दिग्गजांनी सहभाग घेतला. संगीतकार कौशल इनामदार यांनी सिनेमातील गाणी तसेच पार्श्वसंगीत यांचा चित्रपटाच्या कथेनुसार ‘सृजन ते श्रवण’ हा सांगीतिक प्रवास खुसखुशीत शैलीतून विशद केला. सितारवादक चंद्रशेखर फणसे यांनी चित्रपट संगीत आणि प्रसंगाप्रमाणे प्रमाणे गाण्यात सतारीचे सूर कसे व्यक्त होतात हे रसिकांना समजावले.

संमेलनाच्या शुभारंभ सत्रात राकेश बक्षी यांनी वडिल आनंद बक्षी यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीचा आढावा घेतला. ज्येष्ठ दिग्गज संगीत संयोजक, पियानो आणि अकोर्डीअन वादक इनॉक डॅनियलनी गप्पातून आणि रंजक किश्श्यातून आपली सांगीतिक कारकीर्द श्रोत्यांसमोर ठेवली. सत्राचा समारोप करताना या 91 वर्षाच्या अवलियाने कीबोर्ड वादनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले.

नॉस्टेल्जियानाचे सदस्य आणि संगीतकार माधव आजगावकर यांनी अर्धा शतक तालवाद्य गाजवलेले प्रख्यात तालवादक माधव पवार यांच्याशी संवाद साधला. समारोपाच्या सत्रात रेडिओ जॉकी विजय अकेला यांनी तीन पिढ्यांना आकर्षित करणारी गाणी लिहिणारे गीतकार गजलकार मजरूह सुलतानपुरी यांच्या लेखनशैलीवर प्रकाश टाकला.