रायबरेलीमध्ये व्यक्ती नाही, संविधानाची हत्या झाली; तरुणाच्या झुंडबळीवरून राहुल गांधी यांची टीका

उत्तर प्रदेशातील रायबरेली जिल्ह्यात हरिओम नावाच्या एका दलित तरुणाला चोर समजून जमावाने क्रूरपणे मारहाण करून त्याला ठार मारले. यावरूनच आता लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी मोदी आणि योगी सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले हवेत की, “रायबरेलीमध्ये व्यक्ती नाही तर, संविधानाची हत्या झाली आहे.” X वर एक पोस्ट करत ते असं म्हणाले आहेत.

राहुल गांधी म्हणाले आहेत की, “रायबरेलीत दलित तरुण हरिओम वाल्मिकीची क्रूर हत्या ही केवळ एका व्यक्तीची हत्या नाही, ती मानवतेची, संविधानाची आणि न्यायाची हत्या आहे. आज देशात दलित, आदिवासी, मुस्लिम, मागासवर्गीय आणि गरीब यांचा आवाज कमकुवत झाला आहे. त्यांचा वाटा हिरावून घेतला जात आहे आणि त्यांच्या जीवनाला किंमत उरली नाही. त्यांना लक्ष्य केलं जात आहे.”

ते म्हणाले, “या देशात द्वेष, हिंसाचार आणि जमावाला सत्तेचे आश्रयस्थान आहे. जिथे संविधानाची जागा बुलडोझरने घेतली आहे आणि न्यायाची जागा भीतीने घेतली आहे. मी हरिओमच्या कुटुंबासोबत आहे. त्यांना नक्कीच न्याय मिळेल. हिंदुस्थानचे भविष्य समानता आणि मानवतेवर अवलंबून आहे आणि हा देश जमावाच्या इच्छेनुसार नाही तर संविधानाने चालवला जाईल.”