देशात मतचोरी नाही तर, मतांची लूट सुरू आहे, अखिलेश यादव यांची भाजपवर टीका

देशात मतचोरी नाही तर, मतांची लूट सुरू आहे, अशी टीका समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार अखिलेश यादव भाजपवर केली आहे. मंगळवारी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात निवडणूक सुधारणांवरील चर्चेत बोलताना त्यांनी ही टीका केली आहे. अखिलेश यादव यांनी प्रशासकीय यंत्रणेचा गैरवापर केल्याचा आरोप करत निवडणूक सुधारणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. रामपूर आणि फारुखाबादमधील अलिकडच्या पोटनिवडणुकांचा संदर्भ देत त्यांनी दावा केला की, मतदानाच्या दिवशी पोलीस आणि अधिकाऱ्यांनी लोकांना घराबाहेर पडण्यापासून रोखले. ज्यामुळे मतदानाच्या संख्येवर थेट परिणाम झाला.

अखिलेश यादव म्हणाले की, “रामपूरमध्ये भाजपचा हा पहिला विजय होता आणि त्यांच्या पक्षाने अशा घटनांचे असंख्य पुरावे निवडणूक आयोगाकडे सादर केले. परंतु कोणतीही कारवाई झाली नाही. ही पोटनिवडणुकांमध्ये मतदान चोरी नव्हती, तर मतांची लूट होती.”

निवडणूक रोख्यांच्या मुद्द्यावर अखिलेश यादव म्हणाले की, भाजपला सर्वाधिक निधी मिळाला, त्यानंतर काँग्रेसचा क्रमांक लागला. प्रादेशिक पक्षांना संघर्ष करावा लागत आहे. आम्हाला काहीही मिळाले नाही. निवडणूक खर्चात भाजपचा वाटा सर्वाधिक आहे, त्यानंतर काँग्रेसचा क्रमांक लागतो. अशातच प्रादेशिक पक्ष कशी स्पर्धा करतील, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.