
नगरपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान विधान परिषदेचे सभापती तसेच सदस्यांबद्दल केलेल्या अवमानजनक वक्तव्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) पदाधिकारी सूर्यकांत मोरे यांना विधिमंडळाच्या विशेष समितीने नोटीस बजावली आहे. यासंदर्भात बुधवारी होणाऱ्या समितीच्या बैठकीत मोरे यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथे नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान 23 नोव्हेंबर रोजी रोहित पवार यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या सभेदरम्यान मोरे यांनी विधान परिषदेचे एकूण कामकाज, तेथील रचना, सदस्य यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्य केले होते. तसेच सभापतींबाबतदेखील आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. याबाबत नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर व श्रीकांत भारतीय यांनी विधान परिषदेत हक्कभंग प्रस्ताव मांडला होता.




























































