
सर्बियाचा स्टार खेळाडू नोवाक जोकोविचने आपल्या लौकिकास साजेसा खेळ करीत अपेक्षेप्रमाणे फ्रेंच ओपन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेच्या चौथ्या फेरीत धडक दिली, मात्र महिला एकेरीत इटलीच्या जॅस्मिन पाओलिनी हिला तिच्याकडून कमी मानांकन असलेल्या खेळाडूकडून पराभवाचा धक्का बसला.
25 व्या ग्रॅण्डस्लॅम पदकाच्या शोधात असलेल्या 38 वर्षीय नोवाक जोकाविचने तिसऱया फेरीत ऑस्ट्रियाच्या फिलिप मिसोलिक याचा 6-3, 6-4, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. रोलॅण्ड गॅरोसच्या लाल मातीवरील त्याचा हा 99वा विजय ठरला. जोकोविचने 2 तास 9 मिनिटांत विजयावर शिक्कामोर्तब करून कारकीर्दीत 16 व्यांदा अंतिम 16 मध्ये प्रवेश केला. दुसरीकडे महिला एकेरीत इटलीच्या जॅस्मिन पाओलिनी हिला 13 व्या मानांकित युव्रेनच्या एलिना स्वितोलिना हिने 4-6, 7-6(8/6), 6-1 असा पराभवाचा धक्का दिला. ही लढत 2 तास 24 मिनिटांपर्यंत रंगली.
बोपन्ना, भांबरी यांचे आव्हान संपुष्टात
रोहन बोपन्ना व यूकी भांबरी या हिंदुस्थानी खेळाडूंचे आपापल्या साथीदारांसोबत पुरुष दुहेरीतील आव्हान तिसऱया फेरीत संपुष्टात आले. बोपन्ना व त्याचा झेक प्रजासत्ताकचा साथीदार अॅडम पावलासेक या जोडीने फिनलॅण्डचा हॅरी हेलियोवारा व ब्रिटनचा हेन्री पॅटन या द्वितीय मानांकित जोडीला कडवी लढत दिली, मात्र बोपन्ना-पावलासेक जोडीला 2-6, 6-7(5/7) अशी हार पत्करावी लागली. दुसर्या सेटमध्ये कमालीचा संघर्ष बघायला मिळाला. मात्र टायब्रेकमध्ये मोक्याच्या वेळी कच खाल्ल्याने बोपन्ना-पावलासेक जोडीचा पराभव झाला. दुसरीकडे यूकी भांबरी व त्याचा अमेरिकन साथीदार रॉबर्ट गॅलोवे या जोडीला ख्रिश्चियन हॅरिसन व इवॅन किंग या नवव्या मानांकित अमेरिकन जोडीने 6-4, 6-4 असे एक तास 17 मिनिटांपर्यंत चाललेल्या लढतीत पराभूत केले.