जोकोविचने फेडररला गाठले; विश्वविक्रमी 369 व्या ग्रॅण्डस्लॅम विजयांची साधली बरोबरी

टेनिसविश्वातील ‘नंबर वन’ खेळाडू असलेल्या सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचची फ्रेंच ओपन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेची चौथी फेरी गाठताना चांगलीच दमछाक झाली. मात्र इटलीच्या लोरेंजो मुसेटीविरुद्धच्या संघर्षपूर्ण विजयानंतर जोकोविचने ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेच्या कारकीर्दीत विश्वविक्रमी 369 वा विजय मिळवित सदाबहार टेनिसपटू रॉजर फेडररची बरोबरी केली.

जोकोविचने तिसऱया फेरीत लोरेंजो मुसेटीचे कडवे आव्हान 7-5, 6-7(6), 2-6, 6-3, 6-0 असे परतावून लावले. ही लढत तब्बल 4 तास 29 मिनिटांपर्यंत रंगली. मुसेटीने लागोपाठ दोन सेट जिंकल्यानंतर जोकोविचचा पराभव अटळ वाटत होता, मात्र 24 ग्रॅण्डस्लॅम पदके जिंकण्याचा अनुभव असलेल्या जोकोविचने चिवट प्रतिकार करीत पुढील दोन्ही सेट जिंकून विजयावर शिक्कामोर्तब केले.

स्विटेक, गॉफची आगेकूच

अव्वल मानांकित पोलंडच्या इगा स्विटेकने चौथ्या फेरीत रशियाच्या अनास्तासिया पोटापोवा हिचा 6-0, 6-0 असा सरळ सेटमध्ये धुव्वा उडवित आगेकूच केली. स्विटेकने एकही गेम न गमविता केवळ 40 मिनिटांत विजयावर शिक्कामोर्तब केले. दुसरीकडे तृतीय मानांकित अमेरिकेच्या कोको गॉफने चौथ्या फेरीत इटलीच्या एलिसाबेटा कोकियारेटो 6-1, 6-2 असा सहज पराभव केला.

बोपण्णाची दुहेरीत विजयी सलामी

हिंदुस्थानचा रोहन बोपण्णा आणि त्याचा अमेरिकन साथीदार मॅथ्यू एब्डेन या द्वितीय मानांकित जोडीने ऑर्लंडो लुझ व मार्सेलो झोरमन या ब्राझीलच्या जोडीचा 7-5, 4-6, 6-4 असा पराभव करीत विजयी सलामी दिली. बोपण्णा-एब्डेन जोडीला सरळ सेटमध्ये विजय मिळविता आला नाही. ब्राझीलच्या जोडीने दुसरा सेट जिंकून लढतीत पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, मात्र बोपण्णा-एब्डेन जोडीने तिसरा सेट जिंकून विजयावर शिक्कामोर्तब केले.