
कारकीर्दीतील दहावे ऑस्ट्रेलियन ओपन विजेतेपद पटकावण्याचे स्वप्न उराशी बाळगून ऑस्ट्रेलियात आलेल्या सर्बियाच्या जागतिक अग्रमानांकित नोवाक जोकोविचचा विजनवास अखेर संपुष्टात येण्याचे संकेत आहेत. ऑस्ट्रेलियन खुली ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धा सुरू होण्यासाठी एका आठवडय़ाहून कमी अवधी शिल्लक असतानाही जोकोविचच्या समावेशाबाबत अनिश्चितता कायम होती. मात्र आता वर्षातील पहिल्या ग्रॅण्डस्लॅम ऑस्ट्रेलियन ओपनचा मुख्य ड्रॉ जाहीर झाला आहे. जगातील नंबर वन खेळाडू आणि नऊ वेळा ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन नोवाक जोकोविचलाही त्यात स्थान मिळाले आहे.
गेल्या वर्षीच्या 17 डिसेंबरला रात्री माझ्या कोरोना चाचणीचा सकारात्मक निकाल आला. परंतु एका प्रतिष्ठत वृत्तपत्राला शब्द दिल्यामुळे त्या कामानिमित्त 18 डिसेंबरला घराबाहेर पडलो. तेव्हा वेळीच विलगीकरण केले असते तर माझ्या ऑस्ट्रेलियातील प्रवेशावर इतका वाद उद्भवलाच नसता. – नोवाक जोकोविच, जागतिक अग्रमानांकित टेनिसपटू






























































