
मोबाईल सिमकार्डप्रमाणे आता गॅस सिलिंडर पोर्टेबिलिटीचा पर्याय ग्राहकांना मिळणार आहे. त्यामुळे ऐनवेळी गॅस सिलिंडर न देणाऱ्या कंपनीला डच्चू देता येणार आहे. यामुळे गृहिणींना सर्वाधिक दिलासा मिळेल. सध्या इंडेन, भारत व एचपी गॅस सिलिंडरचा पर्याय ग्राहकांकडे आहे. यापैकी कोणत्याही कंपनीची सेवा बदलायची असल्यास नवीन खरेदी करण्याची गरज नाही. मोबाईल पोर्टेबिलिटीनुसार फक्त कंपनी बदलणे शक्य होणार आहे. याने प्रत्येक कंपनी ग्राहक जपण्यावर अधिक भर देईल. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळ (पीएनजीआरबी) ‘एलपीजी पोर्टेबिलिटी’ नावाच्या योजनेवर काम करत आहे. ही योजना प्रत्यक्षात आल्यानंतर ग्राहकांना आपल्या कंपनीऐवजी दुसऱया कंपनीकडून गॅस सिलिंडर ऑर्डर करणे शक्य होईल. तेल नियामक पीएनजीआरबीने ‘एलपीजी इंटर ऑपरेबिलिटी’ मसुद्यावर सूचना आणि हरकती मागवल्या आहेत.