आता पुस्तकं समोर ठेवून देता येणार परीक्षा, सीबीएसईचा नववीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसईने नववीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता नववीच्या परीक्षा ‘ओपन बुक’ पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. या नव्या नियमांनुसार, विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान त्यांची पाठय़पुस्तके, नोट्स आणि संदर्भ साहित्य सोबत ठेवण्याची व त्यांचा वापर करण्याची परवानगी असेल.  या निर्णयाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांवरील परीक्षेचा तणाव कमी करणे आणि त्यांना विषयांच्या संकल्पनांची सखोल समज विकसित करण्यास प्रोत्साहन देणे हा आहे.

‘परीक्षेचा दबाव कमी करून संकल्पनांच्या स्पष्टीकरणावर आता भर दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांनी संकल्पना किती समजून घेतल्या आहेत, यावर लक्ष केंद्रित केले जाईल,’ असे सीबीएसई मंडळाने स्पष्ट केले. या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांचे विषयांचे आकलन सुधारेल आणि शिक्षण पद्धतीत सकारात्मक बदल घडेल, अशी सीबीएसईला अपेक्षा आहे.

पायलट अभ्यासानंतर घेतला निर्णय

डिसेंबर 2023 मध्ये सीबीएसईने इयत्ता 9 वी ते 12 वी साठी ‘ओपन बुक असेसमेंट’चा पायलट अभ्यास केला. या अभ्यासात विद्यार्थ्यांचे गुण 12 टक्के ते 47 टक्क्यांच्या दरम्यान आढळले. यावरून असे दिसून आले की, विद्यार्थ्यांना पाठय़पुस्तके, नोट्स आणि ग्रंथालयातील साहित्याचा प्रभावीपणे वापर करण्यात अडचणी येत होत्या. तथापि, शिक्षकांनी या पद्धतीला सकारात्मक प्रतिसाद दिलाय.

ओपन बुकपद्धत म्हणजे  

‘ओपन बुक’ परीक्षा पद्धतीत विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळी त्यांची पुस्तके, नोट्स आणि इतर संदर्भ साहित्य वापरण्याची परवानगी असते. या पद्धतीचा उद्देश केवळ पाठांतरावर अवलंबून न राहता विद्यार्थ्यांनी विषयाच्या मूळ संकल्पना समजून घ्याव्यात, त्यांचे विश्लेषण करावे आणि त्यांचा योग्य वापर करावा यावर भर देणे आहे.

निर्णयामागील हेतू

या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांवरील परीक्षेचा ताण कमी होईल आणि त्यांना विषयाची खोलवर समज मिळेल. यामुळे केवळ पाठांतर करून गुण मिळवण्याची जुनी पद्धत मागे पडेल. याऐवजी विद्यार्थ्यांनी विषयाची मूलभूत तत्त्वे समजून घेतली आहेत का, याची चाचणी घेतली जाईल. या निर्णयामुळे शिक्षण अधिक अर्थपूर्ण आणि विद्यार्थीपेंद्रित होईल.