पाकिस्तानात गाढवांची संख्या वाढली आहे. सरकारने जारी केलेल्या पशुधन आकडेवारीनुसार, या वर्षी गाढवांच्या संख्येत 1.72 टक्क्यांची वाढ होऊन ती सुमारे 59 लाख इतकी झाली आहे. मागील पाच वर्षांमध्ये एक ते दीड लाख गाढवं वाढली आहेत. पाकिस्तानातील कोसळलेल्या अर्थव्यवस्थेला गाढवांचा आधार आहे. पशुपालन हा पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. तिथे 80 लाखांहून अधिक ग्रामीण कुटुंब पशुपालन करतात. पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेत गाढवांचा मोठा हातभार आहे. पाकिस्तानातून चीनमध्ये मोठय़ा प्रमाणात गाढवांची निर्यात होते. दरवर्षी पाच ते सात लाख गाढवं चीनमध्ये निर्यात होतात. त्यातून अर्थव्यवस्थेला आधार मिळतोय. गाढवांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील ओकार येथे डाँकी फार्म उभारण्यात आलेय. तसं पाहिलं तर चीनमध्ये गाढवांची संख्या 90 लाखांच्या आसपास आहे. मात्र वाढती मागणी पाहून चीन पाकिस्तानातून मोठय़ा प्रमाणात गाढवं आयात करत आहे. गाढवांच्या कातडय़ात जिलेटिन प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. या जिलेटीनपासून औषधांची निर्मिती चीनमध्ये मोठय़ा प्रमाणात होते.